Thursday 14 April 2022

जय भीम

 

आज परम पूज्य डॉ भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेबांची १३१ वी जयंती, त्यांच्या पवित्र स्मृतीस विनंम्र अभिवादन.

"जय भीम ही फक्त आरोळी नाही, ती सुरवात आहे प्रत्येक अन्याया विरुद्ध लढण्याची...!!!"

 


या वर्षी "जय भीम" नावाचा चित्रपट पाहिला, या चित्रपटात कोठेही जय भीम नावाची घोषणा किंवा आरोळी दिली नव्हती पण हा चित्रपट एका कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी सांगत होता. बाबासाहेबांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र दिली. यातील संघर्ष हा अंतिम टप्पा जरी असला तरी याची सुरवात शिक्षणातून होते हे महत्वाचे, बाबासाहेबांचे चरित्र वाचतांना/आभ्यासतांना याची जणिव होत राहते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती बाबासाहेबांना अशाच संघर्षाला तोंड द्यावे लागले. लहान असताना शिक्षणा साठीचा संघर्ष, तरूणपणी अस्पृश्ते विरुद्धचा संघर्ष, समाजात स्वतःला प्रस्थपित करण्याचा संघर्ष, राजकीय संघर्ष, आणि स्वतःच्या समाजाला देशाच्या मूळप्रवाहात आण्यासाठीचा संघर्ष या सर्व काळात ज्ञान आणि शिक्षण बाबासाहेबांच्या सोबत होते. स्वतः शिकत राहणे, त्या शिकण्यातून/ज्ञानातून समाजाचे व देशाचे आध्यायन करणे आणि स्वतःचा एक विचार निर्माण करणे, त्या विचाराकरिता झगडणे/संघर्ष करणे व वंचितना न्याय मिळवून देणे बाबासाहेबांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते. बाबासाहेबांना बुद्धिनिष्ठ समाजाची अपेक्षा होती, असा समाज फक्त शिक्षणामुळे निर्माण होतो. शिक्षणामुळे अन्यायाची जाणीव निर्माण होते, अन्याया विरुद्ध संघर्ष करण्याची सुरवात संघटित होण्यातून होते  आणि संघर्षा मुळे न्याय मिळतो हे बाबासाहेबांच्या चरित्रातून शिकायला मिळते. चवदार तळ्याचा संघर्ष फक्त पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता तर मूलभूत आधिकारां साठी होता, एकच पाणवठा सारख्या अनेक मूलभूत अधिकारा पासून वंचित असलेल्या समाजाला न्याय देण्याची सुरवात चवदार तळ्याच्या संघर्षातून बाबासाहेबांनी मिळवून दिला.



मागील वर्षी जेव्हा धनंजय कीर लिखित बाबासाहेबांचे चरित्र वाचायला घेतले तेव्हा त्यांच्या आयुष्याचे अनेक नवे पैलू समजायला सुरवात झाली. पुस्तकांबद्दल बाबासाहेबांना विशेष आकर्षण होते, मुंबईतील राजगृह या त्यांच्या निवासस्थानी खूप मोठे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात देश-विदेशातून त्यांनी आणलेली अनेक पुस्तके आहेत. न्यूयार्क मधील आठवण धनंजय कीर यांनी लिहून ठेवली आहे, बाबासाहेबांनी एकदा २००० जुनी पुस्तके न्यूयॉर्क मधून विकत घेतली व भारतात पाठवली होती. लंडन असेल किंवा न्यूयॉर्क असेल तेथील वास्तव्यात अनेक पुस्तके बाबासाहेबांच्या सोबत होती व नंतर ती मुंबईत संग्रहित करण्यात आली.

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर