Monday 2 October 2023

बापू, शास्त्री आणि मी

 


माझा जन्म ९० च्या दशकातला, बापू आणि शास्त्री जी सव्वा शतक अगोदर जन्मलेले, आमच्यात एक पिढी, दोन पिढी नव्हे तर चार पाच पिढ्यांचा जनरेशन गॅप, त्यामुळे आमचा एकमेकांशी प्रत्येक्ष असा संपर्क नाहीच. त्यात मी काँग्रेसी विचारांचा नाहीच त्यामुळे बापू आणि शास्त्री जी यांची भेट पुस्तकांतूनच झाली. बापूंची पहिली ओळख डोळ्यावर गोल चष्मा, डोक्यावर टक्कल, हातात काठी, पडलेली दात,  गुडघ्या पर्यंत धोतर आणि अंगात पंचा नेसलेला एक म्हतारा अशीच झालेली. शालेय शिक्षणात भारताला स्वातंत्र्य गांधीजीं मुळे मिळाले वाटायचे पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यावेळी माहित नसल्यामुळे ते कोणामुळे मिळाले याचे फार कुतूहल नव्हते. दुसऱ्यांदा बापू भेटले  Richard Attenborough दिग्दशित आणि Ben Kingsley च्या  १९८२ साली आलेल्या "गांधी" चित्रपटातून, हा चित्रपट सुद्धा माझ्या जन्मापूर्वीचा पण नंतर समजत्या वयात पहिला आणि बापू वेगळेच भेटले. जोहान्सबर्ग च्या रेल्वे स्टेशन वर रेल्वेतून अपमानित करून बाहेर काढलेला एक वकील ते भारतीय स्वातंत्र्य युद्धातील नेते (गांधीजींना युद्ध हा शब्द मान्य होईल का नाही माहित नाही) अशी ओळख झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रत्येक व्यक्तिमत्वां सोबत गांधीजी वेगवेगळे सापडायला लागले. नेहरू सोबतचे बापू वेगळे, सुभाष म्हणून नेताजींना बोलवणारे गांधीजी वेगळे, टिळकांचा मार्ग वेगळा हे म्हणणारे मोहनदास वेगळी, बाबासाहेबांच्या सोबत पुणे करार करणारे गांधीजी वेगळे किंवा सावरकरांना अमान्य असणारे गांधीजी वेगळे, प्रत्येक व्यक्तिमत्वा सोबत मला वेगळे बापू भेटले. गांधी जींचं तत्वज्ञान ज्याला आता गांधीगिरी म्हटलं जात (दादागिरी शी यमक जुळणारे हे सुद्धा बापुना मान्य होईल का नाही माहित नाही) प्रत्येकाने वेगळे मांडले आहे. कोणाचे गांधीजी कष्टकऱ्यांचे आहेत, कोणाचे बापू अस्पृश्यांचे आहेत (गांधी जींचा शब्द "हरिजन" हरी चे जण) कोणाचे बापू शेतकऱ्यांचे आहेत, कधी गिरणी कामगारांचे आहेत, कधी मुसलमानाचे आहेत, कधी हिंदूंचे आहेत, बापू ग्राम उद्योगातून निर्मिती करत आहेत, बापू कापसा पासून सूत काढत तर आम्ही संघीचे सेवा व्रत मानणारे आहेत. राजकीय गांधीजी  कधी गांधीजी गोलमेज परिषदेत भेटतात, कधी इर्विनग करारात दिसतात. एक ना अनेक रूपे बापूंची भेटली पण बापू भावले ते त्यांच्या हट्टी निग्रही स्वभावात, गांधीजी त्यांचा तत्वा बद्दल हट्टी होते. ते कधीच स्वतःच्या विचारांना मुरड घालत नसत. गांधीजींच्या सत्याच्या आग्रह बद्दल मी फार आशावादी नाही, सत्याला सुद्धा स्थल, कालच्या मर्यादा आहेत. युनिव्हर्सल ट्रूथ सुद्धा स्थल काल बदलल्या वर असत्या ठरते त्यामुळे पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य असे काही असत नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या विचारांशी निश्चयी बापू मी खूप स्वीकारतो. माझे विचार मला मान्य आहेत आणि मी ते स्वीकारलेत हा विश्वास गांधीजी मला देतात. सत्याच्या बाबतीत ज्याप्रमाणे मी आग्रही नाही त्या प्रमाणे अहिंसा सुद्धा मला वाटते. अहिंसा हे गांधीजींचे पूर्णपणे राजकीय अस्त्र होते. आता अहिंसे बद्दल फार मी बोलणार नाही. गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्यातील सामान धागा म्हणजे त्यांचे "सामान्यपण", सामान्य माणसात "असामान्य" शक्ती असते हे गांधीजी आणि शास्त्रीजी यांनी दाखून दिले. दोघांचे विचार  सामान्य होते पण ते सर्वमान्य झाले, "वक्तृत्त्व" सामान्य होत पण त्यामुळे करोडो भारतीयांना प्रेरणा मिळाली, असंख्य भारतीयांना दिशादर्शक वक्तृत्त्व त्याचे होते. बापूंच्या सामान्य भाषेतून चंपारण्याचा शेतकरी लढा उभा राहिला तर सौराष्ट्रातल्या मीठ  उत्पादकांसाठी पायी यात्रा निघाली.

बापू पासून प्रेरित झालेल्या अनेक पिढ्या आमच्या मराठवाड्यात आहेत, आज सुद्धा आमच्या ग्रामीण घरात गांधीजींच्या तस्बिरी पासून अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या तसबिरी असतात, मात्र  नंतरच्या काळात बदल झाले जसे विचार आणि विचारधारा बदलल्या तसे आद्य पुरुष सुद्धा बदलले पण बापू कायम होते. कोण्या एका निर्बुद्ध व्यक्तीने बापुना संपवल्याचे सांगितले जाते पण भारताच्या इतिहासातील अनेक व्यक्तिमत्व गांधीजींमुळेच जिवंत आहेत. बापू संपत नसतात.

 

गांधी जी आणि लाला बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन

 

 

विराज वि देवडीकर