Sunday 21 May 2023

'कर नाटक' आणि ऑपरेशन लोटस

 

आज कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी झाला, स्पष्ट बहुमतातील काँग्रेस चे सरकार स्थापन झाले. सिद्धरामय्यां यांनी मुख्यमंत्री तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली. आठ दिवसा खाली कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला व त्यात भाजपा ला धोबीपछाड देत काँग्रेस ने स्पष्ट बहुमत मिळवले आणि एकहाती सत्ता स्थापन केली. नक्कीच सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचे  या विजया बद्दल अभिनंदन करायला हवे आणि भाजपाने अपयशाचे चिंतन करायला हवे. भाजपाचा एकूणच प्रचार या कर्नाटक निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारा नव्हता एवढे निश्चित. तूर्तास भाजपाच्या पराभवा बद्दल एवढेच.

ही निवडणूक जिंकून सुद्धा काँग्रेस मधील आत्मविश्वास अपूर्ण दिसत आहे. मागील आठ दिवसा पासून काँग्रेस मध्ये कर्नाटका मधील सत्ता प्रमुख बनण्यासाठी जी चढा-ओढ लागली आहे त्यावरून असे दिसते कि काँग्रेस मागील काही वर्षाच्या इतिहासातून काही ही शिकली नाही. म्हणजे एकाच सरकार मध्ये दोन सत्ता केंद्र हे काँग्रेस चे जुने गणित या नवीन सरकार मध्ये सुद्धा कायम आहे. इतिहासात पहिले तर लक्षात येईल की राजस्थान मधील सत्ता संघर्ष कायम आहे गहिलोत विरुद्ध पायलट ही निवडणूक सूरु असताना सुद्धा राजस्थान मधील काँग्रेस अस्थिर होती. स्वतः पंतप्रधान त्यांच्या राजस्थान मधील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री गहिलोत यांच्या समोर या अस्थिर ते बद्दल बोलले आहेत. मध्य प्रदेशात तेच झाले कमलनाथ विरुद्ध सिंधिया यात सिंधीया यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस चे सरकार गेले. आसाम मध्ये तरुण गोगई विरुद्ध हेमंत बिस्वा सरमा यात सुद्धा सराम यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस च्या हातून आसाम निसटले, मागील दोन सलग निवडणुकीत भाजप आसाम मध्ये सत्तेत आली आहे. पंजाब चे तर त्याच्या पुढचे आहे, डॉ अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू . ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब मध्ये मुख्यमंत्री बदलला आणि सिद्धू यांच्या हातातील कटपुटली नेतृत्व काँग्रेस ने दिले. मागासवर्गीय असे आवरण असलेलं नेतृत्व पंजाब मध्ये काँग्रेस ला टिकवू शकले नाही. त्याचे प्रत्यंतर म्हणून  पंजाब मधून काँग्रेस चा सुपडा साफ झाला व आप चे सरकार स्थापन झाले. पाकिस्थान सीमेशी लागून असलेल्या राज्यात काँग्रेस च्या चुकीच्या निर्णया मुळे आज खलिस्थान समर्थक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा पाकिस्थान नक्की घेत आहे. छत्तीसगड मध्ये सुद्धा अशीच कहाणी आहे. मुख्यमंत्री भूपेश बहेल विरुद्ध टी एस  सिंग देव यांच्यात वाद आहे. काँग्रेस शासित राज्यांची सध्याची ही स्थिती आहे.

महाराष्ट्रात सुद्धा ये पेक्षा वेगळे घडलेले आपल्याला दिसत नाही यशवंतराव, वसंत दादा पाटील किंवा वसंतराव नाईक यांचा काळ काय किंवा विलासराव देशमुख यांच्या पासून ची सुरवात काय, हीच स्थिती पहायला मिळते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रभा राव प्रदेश अध्यक्ष होत्या व त्यांच्या रूपाने राज्यात दुसरे सत्ता केंद्र निर्माण झाले होते. तीच परिस्थिती अशोकराव चव्हाण विरुद्ध माणिकराव ठाकरे अशी होती तर नंतर पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यात होती. महाराष्ट्रात या प्रत्येक सरकार चे पाय ओढण्याचे काम त्याच सरकारच्या प्रदेश प्रमुख्याने केलेले दिसते. एकवढेच काय नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पद सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले असे सुद्धा काही विधिमंडळ तज्ञ सांगत आहेत. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी विधानसभा अध्यक्ष पद रिक्त होते व ते काँग्रेस च्या नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे.

काँग्रेस स्वतःच्याच नेतृत्वाला चेक देणारे प्रति नेतृत्व निर्माण करते आणि त्यातून काँग्रेस च्या एकूणच राजकारणाच्या ऱ्हास होते. काँग्रेस ने कर्नाटकात जे केले त्यातून ऑपरेशन लोटस ला खतपाणी मिळणार आहे. भाजप निश्चितच या सरकार मधील कमकुवत दुवा हुडकण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याद्वारे हे सरकार भाजपा ला पडणे सोपे जाईल. या दोन सत्ता केंद्रा मुळे भाजपा ला ऑपरेशन लोटस करण्यासाठी मदतच मिळणार आहे. भाजपा सारखी महाशक्ती विरोधात असताना काँग्रेस ने स्वतःच्या चुका मधून शिकणे गरजेचे आहे. २०२४ नंतर भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास "कर-नाटकाचा" दुसरा अंक सुरु होईल एवढे निश्चित...

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर