Saturday 2 October 2021

गांधीजी

 #वर्षाचा_दिवस_२७५वा

परवा गांधी जयंती निमित्याने मुलीला भाषण लिहून देत होतो, तेव्हा माझ्या लहानपणीची आठवण झाली. लहानपणी शाळेत असताना गांधीजी म्हटलं कि अनेक टवाळखोर पोर "म्हतारा, टाकल्या, दात पडका" म्हणून संबोधायची, ते बालबोध दिवस होते पण जस जसा मोठा झालो तस तस बोध व्हायला सुरवात झाली आणि गांधी या चरित्राची ओळख झाली. ऍग्रीकल्चर ला बीड ला आल्यावर गांधी जींचं आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक वाचले आणि गांधी जी शी नव्याने ओळख झाली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वचा महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सामान्य पण होते, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे जाणवते. गांधीजी याच सामान्य पणा मुळे असामान्य व्यक्तिमत्व बनले असे म्हणता येऊ शकते. हा सामान्य पणा त्यांच्या लहानपणा पासून त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनां मध्ये दिसून येतो. बालपण, शिक्षण, लग्न, उच्च शिक्षण या मध्ये हा सामान्य पणा स्पष्टपणे जाणवतो. गांधीजींनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक चुका स्वीकारल्या आणि स्वतःच्या आत्मचरित्रात मांडल्या सुद्धा, त्यांचे आत्मचरित्र वाचताना आपल्याला हे विशेष जाणवत राहते.  या सामान्यपणातूनच त्यांच्यात तत्वनिष्टता निर्माण झाली असे म्हणता येऊ शकते, गांधीजी प्रचंड तत्वनिष्ठ होते आणि त्यांनी वैयक्तिक व राजकीय आयुष्यात ती तत्वे तेवढ्याच निष्ठेने पाळली. 


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामान्य भारतीयांना जोडण्याचे काम गांधीजींनी केले, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंग असे आहेत ज्यामुळे सामान्य भारतीय या लढ्याशी जोडला गेला, ज्यात असहकार आंदोलन असेल, मिठाचा सत्याग्रह असेल किंवा चले जावं चळवळ असले. सामान्य भारतीय या प्रकारच्या लढ्यातून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू शकला. उपोषण, मौन, असहकार, स्वदेशी या सामान्य आंदोलना मुळे सामान्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर उरलाच पण स्वातंत्र्य लढ्याची चेतना भारत भर पोहंचवण्यास मदत झाली, या सर्व आंदोलनाची व्याप्ती भारत भर झाली आणि ते त्यांचे असणारे सामान्य स्वरूप आणि सर्व सामान्य लोकांचा सहभाग. १९१६ साली चंपारण्यातील निळं उत्पादक शेतकऱ्यांचा लढा गांधीजींच्या नेतृत्वा खाली लढला गेला व यशस्वी झाला, हा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह ज्यामुळे सामान्य भारतीय लोकांना गांधीजींची ओळख झाली. गांधीजींचं नेतृत्व असामान्य होत हे निर्वीवादीत सत्य आहे. गांधीजींनी भारतीय सामान्य जणांना व्यवस्थित जाणलं होते, सामान्य भारतीयांना जोडल्याशिवाय भारताचे स्वतंत्र शक्य नाही याची जाण गांधीजींना नक्कीच होती. सामान्य लोकांच्या मध्ये रमणारे नेतृत्व गांधीजींचे होते.गांधीजींच्या नेतृत्वाची भुरळ आज सुद्धा असंख्य भारतीयांच्या मनावर आहे. अनेक सामान्य घटनांतून गांधीजींनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. टिळकांच्या निधना नंतर नेतृत्वहीन झालेला भारतीय स्वातंत्र्यलढ्याला गांधीजींनी नेतृत्व तर दिलेच पण स्वरूप सुद्धा दिले. सामान्य भारतीय मनाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडण्यासाठी गांधीजींनी अर्ध नग्न असणाऱ्या सामान्य लोकं प्रमाणेच गांधीजींनी स्वतःचा वेष केला व तो आयुष्यभर जपला. 


गांधीजींची हिंदू धर्मा वरती निष्ठा होती आणि हिंदू संस्कृतीवर त्यांचा दृढ़ विश्वास होता. गांधीजींच्या दैंनंदिन आयुष्यातील अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे त्यांची हिंदू धर्मा वरील श्रद्धा स्पष्ट होते. या द्वारे सुद्धा गांधीजींनी स्वतःला सामान्य भारतीयांशी जोडले होते व त्याचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी करून घेतला.

गांधीजींच्या राजकीय विचारांशी आक्षेप असू शकतात, सक्षम लोकशाही पद्धतीत ते स्वीकारले पाहिजेत. माझ्या सहित अनेक जण त्यांच्या राजकीय मतांशी सहमत नसतील पण जगातील अनेक विचारवंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकारते, उद्योग व इतर क्षेत्रातील प्रतिभावंत आज सुद्धा गांधीजींना प्रेरक मानतात ते त्यांच्या सामान्यपणा मधून निर्माण झालेल्या सर्व व्यापी नेतृत्वाला.

आज गांधीजींच्या १५२ व्या जयंती निमित्याने त्यांना विनम्र अभिवादन

 

विराज विजयकुमार देवडीकर