Sunday, 10 September 2023

डिनर डीप्लमसी

मागच्या आठवड्यात राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांचा मटण बनवतानाच एकत्रित व्हिडीओ यु ट्यूब वर आला होता. काही वेळातच या व्हिडीओ ला अनेकांनी पहिले व त्याची संख्या काही लाखात पोहंचली. डिनर डीप्लमसी च्या नवा खाली राजकीय बांधणी अराजकीय व्यासपीठावरून होत आली आहे, त्याचीच उजळणी या व्हिडिओतून दिसते. मतदारांवरती प्रभाव निर्माण करणे व त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या पोटातून मना पर्यंत पोहंचण्या करता डिनर डीप्लमसी असते. या व्हिडिओत राहुल गांधी लालू प्रसाद यादव यांच्या घरी जाऊन मटण चंपारण पद्धतीने (बिहारी)  शिजवताना दिसत आहे. या मटणाची रेसेपी लालू प्रसाद यादव राहुल गांधींना सांगतात आणि राहुल जी त्या प्रमाणे मटण करतात. त्यानंतर एकत्रित त्या मटणाचे जेवण राहुल जी, लालूजी करतात. सोबत जेवताना अराजकीय प्रकारे  राजकीय मत प्रदर्शित करतात, राहुल जी एकप्रकारे लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेतात. या व्हिडिओत राहुल गांधी लालू जी ना विचारतात, " जेवण बनवणे आणि राजकारण यात फरक काय आहे? तुम्ही यात सर्व एकत्रित केले आणि राजकारणात सुद्धा !" यावर लालू जी उत्तर देतात "सर्वकाही एकत्रित केल्या शिवाय राजकारण होऊच शकत नाही". त्यानंतर राहुल गांधी लालू जीना सध्याच्या राजकीय परिस्थिती वरती प्रश्न विचारतात आणि लालू जी त्यांच्या स्टाईल मध्ये उत्तर देतात, अर्थात त्यांच्या टीकेचा रोख केंद्रातील भाजप सरकार वरती असते. 


हे नक्की कि हा प्रचाराचा भाग आहे, योग्य प्रकारे त्याची मांडणी केली आहे. लोकांवरती सामान्य मतदारावरती त्याचा प्रभाव निर्माण होईल अशी योजना त्यातून दिसून येते. या पूर्वी सुद्धा राजकारण्यांनी स्वतःच्या हातून स्वयंपाक करणे किंवा जेवण करणे व त्याचा वापर राजकीय प्रचारा करता करणे सामान्य आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत भरलेल्या एका प्रदर्शना मध्ये पंतप्रधानांनी लिट्टी चोखा हा बिहार मधील शाकाहारी पदार्थाचा स्वाद घेतला. याच काळात बिहार मध्ये विधानसभेच्या निवडणूक होत्या व बिहार मधील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच पंतप्रधानांनी लिट्टी चोखा खाल्ले असा आरोप विरोधकांनी केला होता. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंतप्रधान निवासस्थानात कायम समोसा चटणी, फापडा जिलेबी या शाकाहारी पदार्थांचा नाश्ता असायचा नंतर डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर त्यात बदल झाला व वेस्टर्न नाश्त्याची सोया करण्यात आली. संजय बारू लिखित "an accidental prime minister" या पुस्तकात त्याचा संदर्भ सापडतो. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यात जेव्हा-जेव्हा मतभेद व्हायचे तेव्हा अडवाणी वाजपेयी ना भोजनाचे आमंत्रण द्यायचे आणि भोजनात त्यांच्या आवडीची  "सिंधी कढी" असायची, अटल बिहारी वाजपेयी चा विरोध कढी च्या झुरक्या सोबत मावळून जायचा. 


महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकारने स्व बाळासाहेबांच्या आदेशावरून झुणका भाकर केंद्र सुरु केले आणि अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला व महाराष्ट्राच्या राजकारणात पोटातून मनात शिरण्याचा पहिला प्रयोग झाला. दक्षिणेत सुद्धा "अम्मा किचन" या नावाने जयललिता मुख्यमंत्री असताना अल्पदरात खानावळ सुरु करण्यात आल्या व त्याद्वारे मतदारांवरती प्रभाव निर्माण करण्यात आला. नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा जागतिक पातळीवर तृणधान्य चा आहारातील वापर प्रसाराचे कार्य केले. युक्रेन रशिया युद्ध मुळे निर्माण झालेल्या गव्हाच्या टंचाईला तृणधान्य चे उत्तर भारताने दिले. सध्या चालू आलेल्या G20 बैठकीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर तृणधान्यांच्या पदार्थाची रेलचेल होती.  

राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांनी एकत्रित केलेल्या मटणाला सुद्धा अजून एक वेगळी राजकीय चव आहे ती म्हणजे, भाजप ने व भाजपच्या नेत्यांनी कायम  शाकाहारी जेवणाचा पुरस्कार केला आहे. याचा अर्थ भाजपचा मांसाहारी जेवणाला विरोध आहे असे नाही पण  भारतीय जीवन पद्धतीत शाकाहारी जेवण अशी मांडणी भाजपा तर्फे केली गेली, कित्तेक भाजप नेते सार्वजनिक रित्या शाकाहारी असल्याचे सांगतात व शाकाहाराचे सेवन करतात. त्याला उत्तर म्हणून राहुल गांधी व लालू प्रसाद यादव यांनी मांसाहारी जेवण सार्वजनिक रित्या बनवले सुद्धा आणि त्याचे भोजन सुद्धा केले. राहुल गांधी यांच्या या कृती मुळे सामान्य मतदार INDIA आघाडी कडे किती आकर्षित झाले व त्याचे रूपांतर मतात होईल का नाही ते माहित नाही मात्र त्यांच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी नक्की केला आहे.

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर