Sunday, 7 February 2021

चौरी-चौरा के हुतात्मा

 

मागील आठवड्यात कृषी आंदोलनाच्या आरोप-प्रत्यारोपात एका ऐतिहासिक आणि भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महत्वाच्या घटनेचे शताब्दी वर्ष सूर झाले, या घटनेमुळे ब्रिटिश सरकारला जाणीव झाली की, स्वातंत्र्याची आग भारताच्या खेड्या-पाड्यां पर्यंत, वाड्या-वस्त्यां पर्यंत पोहचली आहे. सर्व सामान्य व्यक्ती/जनाना स्वातंत्र्याची गरज निर्माण झाली आहे हे ब्रिटिशांच्या ध्यानी आले. ४ सप्टेंबर १९२० ला महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची हाक दिली व संपूर्ण देशाने ब्रिटिश सरकार वर बहिष्कार टाकला, शाळा-कॉलेज, सरकारी कचेऱ्या ओस पडल्या, लोकांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश सरकारचा निषेध करायला सुरवात केली. जालियनवाला बाग हत्याकांड व रॉल्ट ऍक्ट(Rowlatt Act) यांच्या मुळे लोकांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड क्रोध होता. हे आंदोलन भारताच्या लहान-लहान खेड्यापर्यंत पोहंचले होते, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्यातील चौरी-चौरा या गावी सुद्धा या आंदोलनाला सुरवात झाली व पुढे याच ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्य युद्धाला कलाटणी देणारी घटना घडली. 


चौरी-चौरा या घटनेचे दोन मुख्य भागात विभाजन करीता येईल, त्याची सुरवात २ फेब्रुवारी १९२२ ला झाली, मुंडेरा बाजार या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची महागाई आणि दारू विक्री विरुद्ध एक आंदोलन सुरु होते, या आंदोलनात भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व हे आंदोलन असहकार चळवळीचा भाग आल्यामुळे या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली व मारहाण केली. हे आंदोलन निवृत्त सैनिक भगवान अहिर यांच्या नेतृत्वात सुरु होते व त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. ब्रिटिश पोलिसांच्या मनमानी कारभार विरोधात चौरी-चौरा आणि पंचक्रोशीतील लोकांनी ४ फेब्रुवारी १९२२ ला आंदोलन सुरु केले, आसपासच्या खेड्यातील मिळून २ ते ३ हजार लोकांचा जनसमुदाय चौरी-चौरा येथील मुंडेरा बाजार समोर गोळा झाला व त्यांनी ब्रिटिश पोलिसांच्या निषेधार्थ घोषणा देण्यास सुरवात केली. ब्रिटिश पोलीस व ब्रिटिश सरकारच्या विरोधातील घोषणाबाजी मुळे व जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुवातील हवेत गोळीबार केला व जमाव पांगात नसल्याचे पाहून प्रत्यक्ष आंदोलकांवर गोळीबार केला गेला. या गोळीबारात ३ सामान्य लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे जमाव शांत होण्या ऐवजी अधिकच प्रक्षुब्ध झाला व त्यांनी एकत्र येऊन पोलीस चौकीवर हल्ला केला. या वेळी चौकीत कामावर असणारे पोलीस कर्मचारी जमावाने केलेल्या हल्ल्या मुळे बचावा साठी चौकीत लपून बसले. प्रक्षुब्ध जमावाने चौकीत लपलेल्या पोलीसां सहित चौकीला आग लावली व या अग्नीकांडात २३ पोलीस मरण पावले.

या अग्निकांडा मुळे ब्रिटिश सरकार पुरते हादरले व १८५७ प्रमाणे देशात परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लागेचच ब्रिटिश सरकारने चौरी-चौरा परिसरात Martial Law लागू केला, त्या अंतर्गत अनेक निष्पाप लोकांना अटक करण्यात आली, अनेक सर्वसामान्य लोकांवर अत्याचार करण्यात आहे, या अग्निकांडात सहभागी झाल्याबद्दल २२८ आंदोलकांना अटक करण्यात आली, त्यापैकी ६ जणांचा मृत्यू पोलीस चौकशीत झाला तर जिल्हा-सत्र न्यायाल्याने १७२ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. पुढे २० एप्रिल १९२३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायाल्याने हा निकाल रद्द करून १९ जणांना फाशी व ११० जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली. चौरी-चौरा कडांतील १९ आंदोलकांना एकत्रित फाशी देण्याची भारताच्या स्वातंत्र्य युद्धातील पहिली घटना असेल. या घटने नंतर १२ फेब्रुवारीला महात्मा गांधींनी ऐन भरात असलेले असहकार आंदोलन स्थिगिती केले. या निर्णयमुळे क्रांतिकारकांचा एक मोठा वर्ग दुखावला गेला. १६ फेब्रुवारी १९२२ ला "चौरी-चौरा का अपराध" या शीर्षका खाली गांधीजींनी लेख लिहला ज्यात त्यांनी या अग्निकांडा करिता ब्रिटिश पोलिसांसोबत आंदोलकांना सुद्धा जवाबदार ठरवले. मार्च १९२२ ला गांधीजींना राजद्रोह खाली अटक करण्यात आली व पुढे दोन वर्षांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुक्त केले गेले. 



या अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे आठवण ठेवण्यासाठी १९७३ ला स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन "चौरी-चौरा शहीद स्मारक समिती" स्थापन केली व स्मारका साठी १३५०० रुपयांचा निधी उभा केला व त्या पैश्या मधून स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाची निर्मिती केली गेली. या वर्षी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते चौरी-चौरा घटनेच्या शताब्दी समारोहाचे उदघाट्न केले.

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते काही शीर्ष नेतृत्वा मुळे का छोट्या-छोट्या स्वातंत्र्य लढ्यामुळे हा प्रश्न नक्कीच अनुत्तरित आहे पण त्यामुळे या छोट्या-छोट्या लढ्यात शहीद झालेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे महत्व व त्यांचे बलिदान त्यामुळे कमी होणार नाही.

वंदे मातरम                                                                                          विराज देवडीकर

#मराठी_थ्रेड   

संदर्भ:-

https://www.bbc.com/hindi/india-55921031

https://en.wikipedia.org/wiki/Chauri_Chaura_incident

https://www.newsnationtv.com/specials/news/know-what-is-the-chauri-chaura-ancident-because-of-which-mahatma-gandhi-had-to-withdraw-the-non-cooperation-movement-176305.html