Wednesday, 1 May 2024

बारामती लोकसभा_२०२४

 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

सध्या देशभर निवडणुकीचे वातावरण तापत आहे. पहिल्या दोन टप्प्या मध्ये मतदान झाले आहे, तिसऱ्या टप्प्या चे येत्या ७ तारखेला मतदान होत आहे. सर्वत्र प्रचार आणि राजकारण या विषयी चर्चा होता आहे. महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात मतदाना ची टक्केवारी पहिली तर ती ६०-६२% आहे, ही मतदाना ची टक्केवारी बदल घडवणारी नाही असा निष्कर्ष काढता येतो. फार अशी चुरशीची निवडणूक या टक्केवारी वरून दिसत नाही. एकूण या टक्केवारीचा कल सत्ताधाऱ्यांकरता सुखावणारा व विरोधकांना विचार करायला लावणारा आहे. पण त्यात काही महत्वाच्या जागां साठी निवडणूक होत आहे ज्यात बारामती मतदार संघाची लढत चुरशीची होणार आहे. अजून सुद्धा काही मतदार संघ जसे की माढा, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, शिरूर, नगर इत्यादी. पण सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेली निवडणूक म्हणजे बारामती ची “वाहिनी विरुद्ध ताई" अशी होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कदाचित पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवत असेल, तेसुद्धा इतक्या त्वेषाने असे दिसते. बारामतीची निवडणूक या पूर्वी एकतर्फी होत असायची, त्यात फार अशी चुरस नसायची, सुप्रिया ताई विरुद्ध कांचन कुल हि मागील निवडणुकीत थोडी चुरस असलेली होती.  ताई लोकसभेला तर दादा विधान सभेला मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे, मात्र या वेळी परिस्थिती वेगळी आहे. दादांनी मागील वर्षी थोरल्या साहेबांच्या विरुद्ध बंड केले व स्वतंत्र गट निर्माण करून भाजपा व शिवसेना (धनुष्यबाण) यांच्या सोबत सत्तेत गेले. दादांना उपमुख्यमंत्री पद मिळाले, सहकाऱ्यानां मंत्री पद मिळाले. दादा पुन्हा एकदा सत्तेत बसले होते पण थोरल्या साहेबांची या बंडाला संमती होती का नाही हे अजून सुद्धा अनाकलनीय आहे. सध्या तो मुद्दा बाजूला ठेऊ. बारामतीची या वेळची निवडणूक अजित दादांसाठी प्रचंड महत्वाची आणि प्रतिष्ठेची होणार आहे. अजित दादांच्या राजकीय भवितव्यासाठी हि निवडणूक फार म्हत्वाची ठरणार आहे. थोरले साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या साठी सुद्धा हि निवडणूक तेवढीच महत्वाची नक्कीच आहे. 

पहिल्यांदी अजित दादांची बाजू पहिली तर लक्षात येईल. अजित दादांचे मागील वर्षातील बंड हे काही पहिले राजकीय बंड नव्हते, या पूर्वी सुद्धा त्यांना राजकीय नाराजी किंवा रुसवा होताच पण ते पवार साहेबांनी बंद दाराआड घालवला त्यामुळे कुटुंबातील व पक्षातील फूट टाळली होती. मात्र मागील वर्षी दादा राष्ट्रवादी(घड्याळ) पक्षा सहित वेगळे झाले व या परिवारीक  राजकीय नाट्याला सुरवात झाली. २०१९ च्या सार्वत्रिक  निवडणुकीत सुद्धा थोरल्या साहेबांच्या मता विरुद्ध मावळ मधून अजित दादांनी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा व त्यांच्या नावाने मागितलेल्या मता मुळे शिवसेना (धनुष्यबाण) चे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला आणि अजित दादांच्या राजकारणाला धक्का बसला. त्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत स्थान सुद्धा डळमळीत झाले होते. त्या नंतर दादांचा भाजपा सोबत सकाळचा शपथविधी झाला (त्या शपथविधीला थोरल्या साहेबांची संमती होती असे दादा आता प्रचारा दरम्यान सांगत आहेत) पण तेव्हा सुद्धा दादांना माघार घ्यावी लागली. या वेळी सुनेत्रा वाहिनी यांना बारामती लोकसभा मतदार संघातून दादांनी राष्ट्रवादी (घड्याळ) या पक्षातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा वाहिनी विरुद्ध ताई संघर्ष बारामतीत होत आहे. हि निवडणूक जर सुनेत्रा पवार यांनी जिंकली तर दादांची राजकीय भवितव्य बद्दल फार चिंता असणार नाही, कारण भविष्यात दादा भाजपा सोबत च  राहणार आहेत.  राष्ट्रवादी (घड्याळ) पक्ष केंद्रात व राज्यात भाजपा सोबत सत्तेत असेल. सुनेत्रा वाहिनी ना लोकसभेत राष्ट्रवादी (घड्याळ) गटाचे नेते पद व फार झाले तर मोदी सरकार मध्ये मंत्री पद सुद्धा मिळू शकते.  कदाचित दादांना या मुळे भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते. राष्ट्रवादी (घड्याळ) गटात नेत्यांचे इंकमिंग वाढू शकते. मात्र वहिनीचा पराजय  दादांचा पराजय मानला जाईल. दादांच्या राजकीय महत्वकांक्षेला सुरुंग लावणारा पराजय ठरू शकतो. दादांचे पक्षातील विरोधक सक्रिय होतील सोबत दादांचे राष्ट्रवादी (घड्याळ) पक्षातील वजन कमी होईल याचा फायदा सुप्रिया ताई गटाला मिळेल. दादांचे मुख्यमंत्री पदाची इच्छा सुद्धा यामुळे अडचणीत येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाभिमुख चेहरा व नाव वापरून सुद्धा बारामती मधून सुनेत्रा वहिनींचा पराजय झाल्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वा मध्ये अजित दादांचे महत्व कमी होईल. तसेच काही काठावरचे सहकारी सुद्धा राष्ट्रवादी (घड्याळ) गटातून राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस) या गटात जाऊ शकतात. त्यामुळे हि निवडणूक दादांसाठी फार महत्वाची ठरणार आहे.

सुप्रिया ताईंची बाजू पहाता, भाजपा ने बारामती मतदार संघा साठी मोठी मोर्चा बांधणी मागील दोन वर्षा पासून केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वरती बारामती मतदार संघाची जवाबदारी भाजपने सोपवली होती. भाजपाचे या मतदार संघा वरती विशेष लक्ष आहे. बारामती राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस)  कडून हिसकावून घेणे हि तर रणनीती भाजपा ची आहेच. त्यामुळे एक जागा लोकसभेत भाजपा ची वाढणार आहे सोबत त्याद्वारे शरद पवार यांच्या राष्ट्रीय राजकारणाला शह देण्याची योजना या रणनीती मधून दिसत आहे. आता सुद्धा या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्याने शरद पवार व राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस) या गटाला पुणे- बारामती पुरते मर्यादीत ठेवण्यात भाजपाला यश आले आहे. सुप्रिया ताईंचा पराभव हा शरद पवार यांचा राजकारणच पराभव असे चित्र या द्वारे उभे राहू शकते. त्याचा फायदा भाजपा ला येणाऱ्या स्थनिक स्वराज्य संस्था व विधानसभे च्या निवडणुकी साठी होऊ शकतो. सुप्रिया ताईंचा पराभव जरी झाला तरी राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस) या पक्षातर्फे सुरक्षित मतदार संघातून विधान सभेत पाठवले जाऊ शकते. त्यामुळे या राजकीय नाट्याचा पुढील अंक “दादा विरुद्ध ताई” आपल्याला विधान सभेत पाहायला मिळू शकतो. पवार घराण्यातील ही राजकीय लढाई महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळात अनेक बदल घडवून आणेल हे नक्की.  हि निवडणूक पवार कुटुंबात वहिनी विरुद्ध ताई यांच्यात असल्यामुळे भाजपाचा कोणताही शिलेदार यात खर्ची पडणार नाही. बारामतीच्या ह्या निवडणूकित वहिनी व ताई यांच्या पैकी  कोणीही निवडून येवो त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. भाजपच्या या रणनीती मुळे देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील स्थान पक्के तर होणारच आहे पण पवार परिवाराला शह दिल्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा शांत होतील. महाराष्ट्रतील अनेक मराठा राजघराणे भाजपाच्या वाटेवर विधानसभेच्या निवडणुकी पूर्वी दिसू शकतात. देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रीतील सर्वात प्रभावशाली व शक्तिशाली नेता म्हणून दिल्लीत महत्व वाढणार आहे.

 

तूर्त एवढेच

 

 

विराज वि देवडीकर

Sunday, 7 January 2024

लक्षद्विप ला आता लक्ष लक्ष नजरा...

 

नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप चा दौरा केला त्याचे काही फोटो समाज माध्यमातून आणि इतर माध्यमातून प्रसारित झाले आणि अनेकांच्या बुडाला आग लागली. अनेकांना या दौऱ्याचा प्रचंड त्रास झाला. अनेकांना लक्षद्वीप हा भारताचा भाग आहे तेच या दौऱ्यामुळे पहिल्यांदा कळले. अनेकांना लक्षद्वीप भारताच्या नेमके कोणत्या किनाऱ्यावर आहे हेच माहित नव्हते, म्हणजे अरबी समुद्रात आहे कि बंगालच्या उपसागरात येथून सुरवात. तर या लक्षद्विप ची गोष्ट मोठी रंजक आहे.

लक्षद्वीप भारताच्या पश्चिम बाजूस म्हणजे अरबी समुद्रात मलबार कॉस्ट (केरळ) च्या किनाऱ्या पासून २२० किमी अंतरावर ३६ छोट्या छोट्या बेटांचा समूह आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौरस किमी इतके आहे. लक्षद्विप मध्ये एक जिल्हा, १० पंचायत आहेत. एकूण लोकसंख्या २०११ प्रमाणे  ६४४७३ आहे तर बहुतांश मुस्लिम धर्मीय लोक वस्ती येथे आहे. साक्षरतेचे प्रमाण ९१% इतके आहे. लक्षद्वीप भारताच्या केंद्र शासित प्रदेशा पैकी एक आहेत. कवरत्ती हे राजधानीचे ठिकाण आहे. १७व्या लोकसभेत मोहम्मद फैझल हे लक्षद्वीप चे प्रतिनिधी होते. ते महाराष्ट्रतील चार खासदार असलेल्या पक्षाचे सदस्य आहेत व २००९ मधील एका हिंसाचाराच्या खटल्यात जानेवारी २०२३ पासून शिक्षा भोगत आहेत, या शिक्षेमुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले आहे.  भारताच्या नकाशावर लक्षद्वीप मालदीव व भारताच्या मध्ये येते. मालदीव इतकाच किंबहुना त्याहून सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा आणि निसर्ग लक्षद्वीप ला लाभले आहे. पर्यटन करता प्रचंड वाव आणि कमी खर्चात लक्षद्वीप मध्ये शक्य आहे. या पूर्वी सुद्धा भारताचे पंतप्रधान लक्षद्वीप ला गेले होते. १९८७ ला भारताचे त्यावेळेस चे पंतप्रधान स्वा. राजीव गांधी १० दिवसाच्या कौटुंबिक सहली साठी INS विक्रांत वरून लक्षद्वीप ला गेले होते. कवरत्ती येथे पोहांचून छोट्या हेलिकॅप्टर ने ३६किमी अंतरावरील वैयक्तिक बेटावर गेले होते. अर्थात ती कौटुंबिक आणि वैयक्तिक सहल असल्यामुळे माध्यमांना प्रवेश नव्हता आणि तेव्हा समाज माध्यम नव्हती त्यामुळे फक्त त्याविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्या. नाही म्हणायला R K LAXMAN यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटीवर भाष्य तेव्हा केले होते. मात्र पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लक्षद्वीप ला भेट दिली तेव्हा पासून भारतातील आणि भारताच्या शेजारील देशातून अनेकांना त्रास सुरु झाला आहे. पंतप्रधानांच्या या भेटीचा राजकीय व पर्यटन दोन स्पष्ट अर्थ निघतात.



मागील वर्षी मालदीव मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली, त्या निवडणुकीत मोहम्मद मुइझ्झू हे निवडून आले त्यांनी इब्राहिम मोहम्मद सोलीही यांचा पराभव केला. मालदीव च्या अर्थ व्यवस्थेवरती चीनच्या कर्जाचा भार आहे व मोहम्मद मुइझ्झू हे तसे चीन समर्थक उमेदवार सध्या अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये सत्तेवर येताच भारताला सदिच्छा भेट दिली. मात्र त्यांच्या भारत विरोधी कारवाया सुरूच आहेत. त्यांच्या या भारत विरोधी कारवायांना चीन चे पाठबळ आहे असा आरोप केला जातो. त्या दृष्टिकोनातून सुद्धा मा पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी कडे पाहिले जात आहे. मालदीव ला चीन आर्मी बेस बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अरब समुद्रात चीनचे नाविक दल कार्यरत होऊ शकेल. व ते भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे.


दुसरे म्हणजे पर्यटन, समुद्र किनारा लाभलेल्या  सर्व देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असते. श्रीलंका किंवा मालदीव यांच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा हातभार आहे. या दोन्ही देशांच्या शेजारी भारता सारखा खंडप्राय देश आहे. भारत जगातील प्रभावशाली अर्थव्यवस्था बनत आहेत. अशावेळी भारतातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक या


देशांना भेट देत असतात आणि त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतात. पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी मुळे आणि तेथील समुद्र किनाऱ्या वरील व निसर्गाच्या फोटो मुळे अनेक भारतीय येणाऱ्या काळात मालदीव ला भेट देणार होते त्यांचे लक्ष लक्षद्वीप कडे वळले आहे. आर्थिक दृष्ट्या सुद्धा लक्षद्वीप भेट भारतीयांना परवडणारी आहे. त्यामुळेच आज मालदीव चे मंत्री झाहिद रमीझ यांनी पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटीवर टीका केली आणि "भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत आहे." असे म्हटले त्यामुळे त्यांना मालदीव सरकारने  निलंबित केले आहे पण पंतप्रधानाच्या भेटीचा योग्य तो संदेश मालदीव सरकारला मिळाला आहे असे म्हणावे लागले.

तूर्त एवढेच

धन्यवाद

विराज वि देवडीकर

 

https://www.newindianexpress.com/galleries/nation/2019/may/10/from-our-archives-rajiv-gandhis-lakshadweep-holiday-guess-who-else-was-there-102271--4.html

 

Monday, 2 October 2023

बापू, शास्त्री आणि मी

 


माझा जन्म ९० च्या दशकातला, बापू आणि शास्त्री जी सव्वा शतक अगोदर जन्मलेले, आमच्यात एक पिढी, दोन पिढी नव्हे तर चार पाच पिढ्यांचा जनरेशन गॅप, त्यामुळे आमचा एकमेकांशी प्रत्येक्ष असा संपर्क नाहीच. त्यात मी काँग्रेसी विचारांचा नाहीच त्यामुळे बापू आणि शास्त्री जी यांची भेट पुस्तकांतूनच झाली. बापूंची पहिली ओळख डोळ्यावर गोल चष्मा, डोक्यावर टक्कल, हातात काठी, पडलेली दात,  गुडघ्या पर्यंत धोतर आणि अंगात पंचा नेसलेला एक म्हतारा अशीच झालेली. शालेय शिक्षणात भारताला स्वातंत्र्य गांधीजीं मुळे मिळाले वाटायचे पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यावेळी माहित नसल्यामुळे ते कोणामुळे मिळाले याचे फार कुतूहल नव्हते. दुसऱ्यांदा बापू भेटले  Richard Attenborough दिग्दशित आणि Ben Kingsley च्या  १९८२ साली आलेल्या "गांधी" चित्रपटातून, हा चित्रपट सुद्धा माझ्या जन्मापूर्वीचा पण नंतर समजत्या वयात पहिला आणि बापू वेगळेच भेटले. जोहान्सबर्ग च्या रेल्वे स्टेशन वर रेल्वेतून अपमानित करून बाहेर काढलेला एक वकील ते भारतीय स्वातंत्र्य युद्धातील नेते (गांधीजींना युद्ध हा शब्द मान्य होईल का नाही माहित नाही) अशी ओळख झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रत्येक व्यक्तिमत्वां सोबत गांधीजी वेगवेगळे सापडायला लागले. नेहरू सोबतचे बापू वेगळे, सुभाष म्हणून नेताजींना बोलवणारे गांधीजी वेगळे, टिळकांचा मार्ग वेगळा हे म्हणणारे मोहनदास वेगळी, बाबासाहेबांच्या सोबत पुणे करार करणारे गांधीजी वेगळे किंवा सावरकरांना अमान्य असणारे गांधीजी वेगळे, प्रत्येक व्यक्तिमत्वा सोबत मला वेगळे बापू भेटले. गांधी जींचं तत्वज्ञान ज्याला आता गांधीगिरी म्हटलं जात (दादागिरी शी यमक जुळणारे हे सुद्धा बापुना मान्य होईल का नाही माहित नाही) प्रत्येकाने वेगळे मांडले आहे. कोणाचे गांधीजी कष्टकऱ्यांचे आहेत, कोणाचे बापू अस्पृश्यांचे आहेत (गांधी जींचा शब्द "हरिजन" हरी चे जण) कोणाचे बापू शेतकऱ्यांचे आहेत, कधी गिरणी कामगारांचे आहेत, कधी मुसलमानाचे आहेत, कधी हिंदूंचे आहेत, बापू ग्राम उद्योगातून निर्मिती करत आहेत, बापू कापसा पासून सूत काढत तर आम्ही संघीचे सेवा व्रत मानणारे आहेत. राजकीय गांधीजी  कधी गांधीजी गोलमेज परिषदेत भेटतात, कधी इर्विनग करारात दिसतात. एक ना अनेक रूपे बापूंची भेटली पण बापू भावले ते त्यांच्या हट्टी निग्रही स्वभावात, गांधीजी त्यांचा तत्वा बद्दल हट्टी होते. ते कधीच स्वतःच्या विचारांना मुरड घालत नसत. गांधीजींच्या सत्याच्या आग्रह बद्दल मी फार आशावादी नाही, सत्याला सुद्धा स्थल, कालच्या मर्यादा आहेत. युनिव्हर्सल ट्रूथ सुद्धा स्थल काल बदलल्या वर असत्या ठरते त्यामुळे पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य असे काही असत नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या विचारांशी निश्चयी बापू मी खूप स्वीकारतो. माझे विचार मला मान्य आहेत आणि मी ते स्वीकारलेत हा विश्वास गांधीजी मला देतात. सत्याच्या बाबतीत ज्याप्रमाणे मी आग्रही नाही त्या प्रमाणे अहिंसा सुद्धा मला वाटते. अहिंसा हे गांधीजींचे पूर्णपणे राजकीय अस्त्र होते. आता अहिंसे बद्दल फार मी बोलणार नाही. गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्यातील सामान धागा म्हणजे त्यांचे "सामान्यपण", सामान्य माणसात "असामान्य" शक्ती असते हे गांधीजी आणि शास्त्रीजी यांनी दाखून दिले. दोघांचे विचार  सामान्य होते पण ते सर्वमान्य झाले, "वक्तृत्त्व" सामान्य होत पण त्यामुळे करोडो भारतीयांना प्रेरणा मिळाली, असंख्य भारतीयांना दिशादर्शक वक्तृत्त्व त्याचे होते. बापूंच्या सामान्य भाषेतून चंपारण्याचा शेतकरी लढा उभा राहिला तर सौराष्ट्रातल्या मीठ  उत्पादकांसाठी पायी यात्रा निघाली.

बापू पासून प्रेरित झालेल्या अनेक पिढ्या आमच्या मराठवाड्यात आहेत, आज सुद्धा आमच्या ग्रामीण घरात गांधीजींच्या तस्बिरी पासून अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या तसबिरी असतात, मात्र  नंतरच्या काळात बदल झाले जसे विचार आणि विचारधारा बदलल्या तसे आद्य पुरुष सुद्धा बदलले पण बापू कायम होते. कोण्या एका निर्बुद्ध व्यक्तीने बापुना संपवल्याचे सांगितले जाते पण भारताच्या इतिहासातील अनेक व्यक्तिमत्व गांधीजींमुळेच जिवंत आहेत. बापू संपत नसतात.

 

गांधी जी आणि लाला बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन

 

 

विराज वि देवडीकर

Sunday, 10 September 2023

डिनर डीप्लमसी

मागच्या आठवड्यात राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांचा मटण बनवतानाच एकत्रित व्हिडीओ यु ट्यूब वर आला होता. काही वेळातच या व्हिडीओ ला अनेकांनी पहिले व त्याची संख्या काही लाखात पोहंचली. डिनर डीप्लमसी च्या नवा खाली राजकीय बांधणी अराजकीय व्यासपीठावरून होत आली आहे, त्याचीच उजळणी या व्हिडिओतून दिसते. मतदारांवरती प्रभाव निर्माण करणे व त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या पोटातून मना पर्यंत पोहंचण्या करता डिनर डीप्लमसी असते. या व्हिडिओत राहुल गांधी लालू प्रसाद यादव यांच्या घरी जाऊन मटण चंपारण पद्धतीने (बिहारी)  शिजवताना दिसत आहे. या मटणाची रेसेपी लालू प्रसाद यादव राहुल गांधींना सांगतात आणि राहुल जी त्या प्रमाणे मटण करतात. त्यानंतर एकत्रित त्या मटणाचे जेवण राहुल जी, लालूजी करतात. सोबत जेवताना अराजकीय प्रकारे  राजकीय मत प्रदर्शित करतात, राहुल जी एकप्रकारे लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेतात. या व्हिडिओत राहुल गांधी लालू जी ना विचारतात, " जेवण बनवणे आणि राजकारण यात फरक काय आहे? तुम्ही यात सर्व एकत्रित केले आणि राजकारणात सुद्धा !" यावर लालू जी उत्तर देतात "सर्वकाही एकत्रित केल्या शिवाय राजकारण होऊच शकत नाही". त्यानंतर राहुल गांधी लालू जीना सध्याच्या राजकीय परिस्थिती वरती प्रश्न विचारतात आणि लालू जी त्यांच्या स्टाईल मध्ये उत्तर देतात, अर्थात त्यांच्या टीकेचा रोख केंद्रातील भाजप सरकार वरती असते. 


हे नक्की कि हा प्रचाराचा भाग आहे, योग्य प्रकारे त्याची मांडणी केली आहे. लोकांवरती सामान्य मतदारावरती त्याचा प्रभाव निर्माण होईल अशी योजना त्यातून दिसून येते. या पूर्वी सुद्धा राजकारण्यांनी स्वतःच्या हातून स्वयंपाक करणे किंवा जेवण करणे व त्याचा वापर राजकीय प्रचारा करता करणे सामान्य आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत भरलेल्या एका प्रदर्शना मध्ये पंतप्रधानांनी लिट्टी चोखा हा बिहार मधील शाकाहारी पदार्थाचा स्वाद घेतला. याच काळात बिहार मध्ये विधानसभेच्या निवडणूक होत्या व बिहार मधील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच पंतप्रधानांनी लिट्टी चोखा खाल्ले असा आरोप विरोधकांनी केला होता. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंतप्रधान निवासस्थानात कायम समोसा चटणी, फापडा जिलेबी या शाकाहारी पदार्थांचा नाश्ता असायचा नंतर डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर त्यात बदल झाला व वेस्टर्न नाश्त्याची सोया करण्यात आली. संजय बारू लिखित "an accidental prime minister" या पुस्तकात त्याचा संदर्भ सापडतो. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यात जेव्हा-जेव्हा मतभेद व्हायचे तेव्हा अडवाणी वाजपेयी ना भोजनाचे आमंत्रण द्यायचे आणि भोजनात त्यांच्या आवडीची  "सिंधी कढी" असायची, अटल बिहारी वाजपेयी चा विरोध कढी च्या झुरक्या सोबत मावळून जायचा. 


महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकारने स्व बाळासाहेबांच्या आदेशावरून झुणका भाकर केंद्र सुरु केले आणि अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला व महाराष्ट्राच्या राजकारणात पोटातून मनात शिरण्याचा पहिला प्रयोग झाला. दक्षिणेत सुद्धा "अम्मा किचन" या नावाने जयललिता मुख्यमंत्री असताना अल्पदरात खानावळ सुरु करण्यात आल्या व त्याद्वारे मतदारांवरती प्रभाव निर्माण करण्यात आला. नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा जागतिक पातळीवर तृणधान्य चा आहारातील वापर प्रसाराचे कार्य केले. युक्रेन रशिया युद्ध मुळे निर्माण झालेल्या गव्हाच्या टंचाईला तृणधान्य चे उत्तर भारताने दिले. सध्या चालू आलेल्या G20 बैठकीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर तृणधान्यांच्या पदार्थाची रेलचेल होती.  

राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांनी एकत्रित केलेल्या मटणाला सुद्धा अजून एक वेगळी राजकीय चव आहे ती म्हणजे, भाजप ने व भाजपच्या नेत्यांनी कायम  शाकाहारी जेवणाचा पुरस्कार केला आहे. याचा अर्थ भाजपचा मांसाहारी जेवणाला विरोध आहे असे नाही पण  भारतीय जीवन पद्धतीत शाकाहारी जेवण अशी मांडणी भाजपा तर्फे केली गेली, कित्तेक भाजप नेते सार्वजनिक रित्या शाकाहारी असल्याचे सांगतात व शाकाहाराचे सेवन करतात. त्याला उत्तर म्हणून राहुल गांधी व लालू प्रसाद यादव यांनी मांसाहारी जेवण सार्वजनिक रित्या बनवले सुद्धा आणि त्याचे भोजन सुद्धा केले. राहुल गांधी यांच्या या कृती मुळे सामान्य मतदार INDIA आघाडी कडे किती आकर्षित झाले व त्याचे रूपांतर मतात होईल का नाही ते माहित नाही मात्र त्यांच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी नक्की केला आहे.

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर

Sunday, 21 May 2023

'कर नाटक' आणि ऑपरेशन लोटस

 

आज कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी झाला, स्पष्ट बहुमतातील काँग्रेस चे सरकार स्थापन झाले. सिद्धरामय्यां यांनी मुख्यमंत्री तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली. आठ दिवसा खाली कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला व त्यात भाजपा ला धोबीपछाड देत काँग्रेस ने स्पष्ट बहुमत मिळवले आणि एकहाती सत्ता स्थापन केली. नक्कीच सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचे  या विजया बद्दल अभिनंदन करायला हवे आणि भाजपाने अपयशाचे चिंतन करायला हवे. भाजपाचा एकूणच प्रचार या कर्नाटक निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारा नव्हता एवढे निश्चित. तूर्तास भाजपाच्या पराभवा बद्दल एवढेच.

ही निवडणूक जिंकून सुद्धा काँग्रेस मधील आत्मविश्वास अपूर्ण दिसत आहे. मागील आठ दिवसा पासून काँग्रेस मध्ये कर्नाटका मधील सत्ता प्रमुख बनण्यासाठी जी चढा-ओढ लागली आहे त्यावरून असे दिसते कि काँग्रेस मागील काही वर्षाच्या इतिहासातून काही ही शिकली नाही. म्हणजे एकाच सरकार मध्ये दोन सत्ता केंद्र हे काँग्रेस चे जुने गणित या नवीन सरकार मध्ये सुद्धा कायम आहे. इतिहासात पहिले तर लक्षात येईल की राजस्थान मधील सत्ता संघर्ष कायम आहे गहिलोत विरुद्ध पायलट ही निवडणूक सूरु असताना सुद्धा राजस्थान मधील काँग्रेस अस्थिर होती. स्वतः पंतप्रधान त्यांच्या राजस्थान मधील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री गहिलोत यांच्या समोर या अस्थिर ते बद्दल बोलले आहेत. मध्य प्रदेशात तेच झाले कमलनाथ विरुद्ध सिंधिया यात सिंधीया यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस चे सरकार गेले. आसाम मध्ये तरुण गोगई विरुद्ध हेमंत बिस्वा सरमा यात सुद्धा सराम यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस च्या हातून आसाम निसटले, मागील दोन सलग निवडणुकीत भाजप आसाम मध्ये सत्तेत आली आहे. पंजाब चे तर त्याच्या पुढचे आहे, डॉ अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू . ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब मध्ये मुख्यमंत्री बदलला आणि सिद्धू यांच्या हातातील कटपुटली नेतृत्व काँग्रेस ने दिले. मागासवर्गीय असे आवरण असलेलं नेतृत्व पंजाब मध्ये काँग्रेस ला टिकवू शकले नाही. त्याचे प्रत्यंतर म्हणून  पंजाब मधून काँग्रेस चा सुपडा साफ झाला व आप चे सरकार स्थापन झाले. पाकिस्थान सीमेशी लागून असलेल्या राज्यात काँग्रेस च्या चुकीच्या निर्णया मुळे आज खलिस्थान समर्थक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा पाकिस्थान नक्की घेत आहे. छत्तीसगड मध्ये सुद्धा अशीच कहाणी आहे. मुख्यमंत्री भूपेश बहेल विरुद्ध टी एस  सिंग देव यांच्यात वाद आहे. काँग्रेस शासित राज्यांची सध्याची ही स्थिती आहे.

महाराष्ट्रात सुद्धा ये पेक्षा वेगळे घडलेले आपल्याला दिसत नाही यशवंतराव, वसंत दादा पाटील किंवा वसंतराव नाईक यांचा काळ काय किंवा विलासराव देशमुख यांच्या पासून ची सुरवात काय, हीच स्थिती पहायला मिळते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रभा राव प्रदेश अध्यक्ष होत्या व त्यांच्या रूपाने राज्यात दुसरे सत्ता केंद्र निर्माण झाले होते. तीच परिस्थिती अशोकराव चव्हाण विरुद्ध माणिकराव ठाकरे अशी होती तर नंतर पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यात होती. महाराष्ट्रात या प्रत्येक सरकार चे पाय ओढण्याचे काम त्याच सरकारच्या प्रदेश प्रमुख्याने केलेले दिसते. एकवढेच काय नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पद सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले असे सुद्धा काही विधिमंडळ तज्ञ सांगत आहेत. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी विधानसभा अध्यक्ष पद रिक्त होते व ते काँग्रेस च्या नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे.

काँग्रेस स्वतःच्याच नेतृत्वाला चेक देणारे प्रति नेतृत्व निर्माण करते आणि त्यातून काँग्रेस च्या एकूणच राजकारणाच्या ऱ्हास होते. काँग्रेस ने कर्नाटकात जे केले त्यातून ऑपरेशन लोटस ला खतपाणी मिळणार आहे. भाजप निश्चितच या सरकार मधील कमकुवत दुवा हुडकण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याद्वारे हे सरकार भाजपा ला पडणे सोपे जाईल. या दोन सत्ता केंद्रा मुळे भाजपा ला ऑपरेशन लोटस करण्यासाठी मदतच मिळणार आहे. भाजपा सारखी महाशक्ती विरोधात असताना काँग्रेस ने स्वतःच्या चुका मधून शिकणे गरजेचे आहे. २०२४ नंतर भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास "कर-नाटकाचा" दुसरा अंक सुरु होईल एवढे निश्चित...

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर 

Friday, 11 November 2022

भारत जोडो यात्रा

 “इंडिया दॅट इज भारत इज युनियन ऑफ स्टेटस”  राज्यघटना कलम एक चा संदर्भ असलेले हे वाक्य केम्ब्रिज विद्यापीठातील एका कार्यक्रमात काँग्रेस च्या नेतृत्वाने तीन वेळा उल्लेख केला, त्यावर तेथे उपस्थित असलेल्या एका भारतीय तरुणाने त्यांना भारतीय संविधानाच्या सुरवातीला असलेल्या Preamble मधील Nation या शब्दाची आठवण करून दिली, व संविधानकर्त्यांना भारत हे एक राष्ट्र असल्याचे अभिप्रेत होते सांगितले. भारत जोडो यात्रेची मांडणी करताना वरील विचार फार महत्वाचे ठरतात.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आता चार दिवस झाले आहेत, महाराष्ट्रातील सीमावर्ती नांदेड जिल्यामधून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करती झाली. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न निश्चित करत आहे. मुळात हेच उद्दिष्ट या यात्रेचे आहे, गलितगात्र झालेल्या काँग्रेस मध्ये या यात्रे मुळे राजकीय प्राण फुंकण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या करिता काँग्रेस चे आणि राहुल गांधी यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

या यात्रेची सुरवात ७ सप्टेंबर रोजी केरळ राज्यातून झाली, ६० दिवसाच्या वर या यात्रेत राहुल गांधी चालत आहेत आणि दक्षिणेतील राज्य संपून आता ते मध्य भारतातील राज्यात येत आहेत. दक्षिणेतील राज्य त्यामानाने या यात्रे करिता अनुकूल आणि येथील राजकीय परिस्थिती सुद्धा काँग्रेस करता अनुकूल अशी आहे, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा येथे भाजप विरोधी राज्य सरकार आहेत तर आंध्र मध्ये प्रादेशिक पक्ष YSR काँग्रेस सत्तेत आहे, YSR काँग्रेस भाजप करिता सहयोगी आहे.  फक्त कर्नाटक राज्य भाजप शासित आहे. त्यामुळे दक्षिण भारतात यात्रे करताचा प्रवास सुखकर होता. यात्रेची खरी परीक्षा आता सुरु होत आहे, महाराष्ट्रातून ही यात्रा हिंदी बेल्ट मध्ये प्रवेश करेल. हिंदी बेल्ट मधील बहुतांश राज्य भाजप शासित आहेत व हीच राज्य देशाचा पंतप्रधान ठरवतात, विशेष करून उत्तर प्रदेश. त्यामुळे या राज्यात ही यात्रा किती प्रभावशाली ठरेल हे पाहणे जरुरीचे आहे. 


या वर्षाच्या सुरवातीला राजनीती विश्लेषक प्रशांत किशोर यांनी काँग्रेस च्या सर्वोच्च नेतृत्वा समोर काही तथ्याची मांडणी केली व काही बदल अपेक्षित केले,  त्यातील महत्वाचे बदल म्हणजे लोकशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक आणि काँग्रेस अंतर्गत निवडणूका, त्यासोबत प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लोकांची काँग्रेस करिता जोडणी हे दोन प्रमुख बदल काँग्रेस नेतृत्वा समोर ठेवले गेले असण्याची शक्यता आहे. त्यातील काँग्रेस अंतर्गत निवडणुका आणि मल्लीकार्जून खरगे यांची काँग्रेस अध्यक्ष पदी दोन दशका नंतर निवड झाली तर भारत जोडो यात्रेच्या निमित्याने पदयात्रा काढून राहुल गांधी यांचे नेतृत्व सर्वसामान्य लोकं पर्यंत नेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. या पूर्वी सुद्धा ९० च्या दशकात व त्यांनतर २००४ च्या निवडणुकी पूर्वी लाला कृष्ण आडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती आणि त्याचा प्रचंड प्रभाव जन सामन्यात निर्माण झाला होता. देशाचं राजकारण ढवळून निघाले होते व भाजप देशाच्या राजकारणात सत्ता केंद्रित पक्ष झाला होता. देशातील सर्व माध्यम समूहांनी त्यावेळी रथ यात्राचे स्पेशल कव्हरेज केले होते. लाला कृष्ण अडवाणी यांची रथ यात्रा सर्व सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय झाली होती. या रथ यात्रे द्वारे निवडणुकीचे मुद्दे भाजपा ने योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहंचवले होते. त्या मुद्द्यांचा प्रभाव लोकांमध्ये दिसत होता व त्याचे रूपांतर नंतर मतदानात झाले. लाला कृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेचा वाढता प्रभाव पाहून बिहार मधील लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने ती रथ यात्रा अडवली आणि अडवाणी यांना अटक केली.

२०२४ ची तयारी म्हणून या यात्रे कड़े नक्कीच पाहावे लागेल, हि यात्रा १५० दिवसांनी फेब्रुवारी २०२३ ला काश्मीरमध्ये संपेल तेव्हा  देशातील सार्वत्रिक निवडणुकीला फक्त सव्वा वर्ष राहिलेले असेल, अर्थात भाजपने सुद्धा २०२४ च्या निवडणुकीची तयारी नक्कीच सुरु केली आहे. २०१२ च्या हिवाळ्यात अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकाचे आंदोलन दिल्लीत सुरु झाले. अण्णांच्या या आंदोलनाचा फायदा नंतरच्या काळात भाजपाला झाला. ते आंदोलन सर्व व्यापी झाले, भ्रष्टाचार हा विषय लोकांनी लावून धरला आणि तत्कालीन केंद्र सरकार विरुद्ध देश व्यापी आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात समाजातील सर्व स्थरातील लोक सहभागी झाले आणि अण्णा हजारे यांच्या उपोषणाला समर्थन दिले. हे आंदोलन यशस्वी होण्यामध्ये त्यावेळेस माध्यमांनी विशेष भूमिका बजावली. त्या प्रमाणेच काँग्रेस या भारत जोडो यात्रेच्या निमित्याने केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभर या यात्रेच्या माध्यमातून चळवळ उभी करणायचा प्रयत्न सुरु आहे. मात्र या यात्रेस अजून सुद्धा म्हणावे तसे जन आंदोलनाचे स्वरूप आलेले नाही आणि अजून सुद्धा सर्वसामान्य भारतीय या यात्रेत जोडले गेलेले नाहीत.

या यात्रेच्या निमित्याने वातावरण निर्मितीचा काँग्रेस चा प्रयत्न आहे पण अजून तरी या यात्रेचा प्रभाव सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर झालेला दिसत नाही. या यात्रेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्व सहभागी झालेले दिसतात ज्यात प्रादेशिक पक्षांचे नेते, अभिनेते, कलाकार, लेखक, धर्मगुरू, समाज सेवक आणि समाजात प्रभाव निर्माण करणारे लोक उपस्थित आहेत पण सामान्य भारतीय अजून सुद्धा या यात्रे पासून काही अंतर राखून आहे असे दिसते. देशातील प्रमुख माध्यमे सुद्धा या यात्रे बद्दल फार चर्चा करताना दिसत नाहीत. सोशल मीडिया सारखे प्रभावी माध्यम असताना सुद्धा काही मोजकेच पत्रकार या यात्रे बद्दल लिहताना दिसत आहेत तर काही मोजकीच व्यक्तिमत्व या यात्रेत सहभागी होत आहेत.

या यात्रेचे अनेक फायदे काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात होऊ शकतात, त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे राहुल गांधी यांचे देशव्यापी नेतृत  प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याच बरोबर काँग्रेस तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व स्वीकारणार नाही हे या यात्रेतून काँग्रेस ने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेस च करेल हे ठामपणे काँग्रेस ने सांगितले आहे. या यात्रे च्या निमित्याने राहुल गांधी यांना देशातील सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येईल. आपले विचार सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येतील. या यात्रे मध्ये राहुल गांधी यांनी स्वतःचा लुक सुद्धा बदलेल दिसत आहे.

हि यात्रा सुरु असतानाच गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यात निवडणूक होत आहेत. हि दोन्ही राज्य भाजप शासित आहेत, निवडणुकीचा निकाल ही यात्रा संपण्याच्या आत येणार आहे. ही यात्रा गुजरात मध्ये प्रवेश करत असताना तेथील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहंचला असेल. या यात्रेचा परिणाम निवडणूक निकालावरती काय होतो आणि ही यात्रा काँग्रेस करिता किती मतदान मिळवण्यास मदत करते हे पाहणे गरजेचे आहे. 


वंदे मातरम 

विराज वि देवडीकर 

 


Sunday, 14 August 2022

आझादी अभी अधुरी है


तीन दिवसांच्या सुट्ट्या म्हणून आता पुणे सोडत आहे,  पुण्याचे हे टोक ते टोक स्वतःच्या गाडी ने जाताना काही लक्षात येत नाही पण रिक्षा किंवा बस खूप वेगळे जाणवते. मागचे दोन-अडीच तास दक्षिण पुणे ते उत्तर पुणे असा प्रवास केला. रोज च दिसणारे पुणे वेगळे भासले. स्वातंत्राचा अमृत मोहत्सव साजरा करताना पुणे तीन रंगात जणू रंगून गेले आहे. केशरी, सफेत आणी हिरवा रंगांच्या तीन पण मूलभूत रचना. या तिन्ही रंगात नवं निर्मितीची क्षमता आहे. स्वातंत्र आणी नवीन भारताचे प्रतिक हे तीन रंग आहे. यातील अशोक चक्र भारताच्या पूर्ण पणाचे चित्रानं करते. पण हे पूर्ण स्वतंत्र आहे का? स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला मूलभूत  अधिकार आहे. आपले सौभाग्या आपण परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाचा स्वीकार केला आहे. संविधान आपण स्वीकारले आहे पण "खंडित भारत" आपण स्वीकारला आहे का?



" आझादी अभी अधुरी है" या अटल जीं ची कविता आहे, खरंच हे स्वतंत्र्य अजून अपूर्ण आहे, पूर्ण भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. अखंड भारत अजून होने बाकी आहे. हिमालया पासून हिंद सागरा पर्यंत पसरलेला भारत अजून सुद्धा अपूर्ण आहे. हो आहे की..! स्वतंत्र्याच्या पूर्व संध्येला पाकिस्तान विलग झाला, गंगेच्या आणी यमुनेच्या खोऱ्यात वाढलेली संस्कृती विभक्त झाली. रावी, झेलम, सतलाज, चिनाब, सिंधू आमच्या पासून विलग झाल्या, या स्वातंत्र्यचा आम्ही स्वीकार केला पण आमच्याच हिंदूंची आहुती देऊन. सप्त नद्या आणी तीन सागरांनी चरण स्पर्श होणारी आमची माता आज 14 ऑगस्टला व्याकुळ आहे. स्वतंत्र पाकिस्तानचे अस्तित्व हे अखंड भारता चा शेवटचा तुकडा आहे. विद्येच आद्य दैवत माता सरस्वती च ज्ञानपीठीत पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे तर आदी महादेव हिमालच्या पर्वत रंगा मध्ये स्थित आहेत. एक न अनेक संस्कृतिक आणी भावनिक खुणा पाकिस्थान मध्ये आहेत ज्यात सामान्य भारतीय गुंतला आहेत. भगवान श्रीरामाचे "लव" यांनी वसवलेले लाहोर, पेशावर आणी कराची या सर्व शहरात भारतीय संस्कृतीच्या खुणा सापडतात. भारतीय म्हणून जात, धर्म, पंथ, वंश, भाषा आणी लिंग हे मान्य होणारच नाही पण पण खंड भारत स्वीकारणे हे येणाऱ्या पिढ्यान सोबत अन्यायकारक ठरणार आहे. संस्कृती म्हणून भारत अफगाणिस्थान पासून जावा - सुमात्रा, इंडोनेशिया पर्यंत एकच आहे. महाभारतात ल्या माता गांधारी पासून ते बामिया मधील भगवान बुद्धांच्या मूर्ती  पर्यंत  अफगाणिस्तान भारताच्या मुख्य भुभागाशी जोडला आहे तर हिंद महासागरात श्रीलंका ते इंडोनेशिया हे आज सुद्धा भारतीय असलेल्याचे प्रमाण देत आहेत. राजकीय दृष्ट्या हे विभक्त देश आहेत पण भावनिक व संस्कृतीक दृष्ट्या "भारत" या भू भागात सुद्धा नंदात आहे. आक्रमक सीमवाद आणी सीमांचे विस्तारिकारण अनेक देशांचे मुख्य धोरण आहे. One China Policy चीन ची आक्रमकता दाखवते. आपल्या नाकरत्या नेतृत्वा मुळे तिबेट त्यांनी कधीच घेतले आहे, आता अरुणाचलं प्रदेशावर हक्क सांगत आहे, तैवान आणी दक्षिण चिन समुद्र गिळायला ते बसले आहेत. प्रशांत महासागरात  जपान पर्यंत चीन चा ड्रॅगन आग ओकात आहे. मंगोलियन वंशाचे कारण देत आहेत. रशिया युक्रेन वर हक्क सांगत आहे, पुढे जाऊन सोव्हेत रशियाचे विखूरलेले तुकडे एकत्र करण्याचे स्वप्न रशिया पाहिलं. इस्लामिक देशात यापूर्वीच इस्लामच्या नावा खाली एक होण्याचा संकल्प OIC मध्ये केला आहे. युरोपा मध्ये सीमा विस्ताराचा तर इतिहासच आहे. मात्र अखंड भारत मात्र कथित बुद्धीवाद्यांना मान्य नाही. पाकिस्तानच्या स्वरूपात भारताचा शेवट चा तुकडा पडला व अखंड भारताची सुरवात सुद्धा या पासून व्हावी. 


"बस इसीलिए तो कहता हूँ आज़ादी अभी अधूरी है 
कैसे उल्लास मनाऊँ मैं? थोड़े दिन की मजबूरी है॥ 
दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे 
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥"


©विराज देवडीकर 

Wednesday, 22 June 2022

राजकीय सर्वे: महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?

 

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या नंतर झालेल्या राजकीय घडामोडीवर काल पासून आम्ही ट्विटर वर एक सर्वे केला होता. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मनात नेमके काय दडले आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मराठी भाषिक असलेल्या ट्विटर वरील ट्विटर हॅण्डल ने या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे (प्रश्न व पर्याय मराठीत असल्यामुळे). हा सर्वे कोणत्याही राजकीय पक्षा करिता अथवा त्या राजकीय पक्षाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन केलेला नाही. यात नोंदवलेली मते ही वेगवेगळ्या ट्विटर हॅन्डल ची आहेत आमची नाही.

प्रश्न १. भाजपचे पाच ही उमेदवार विजयी, आघाडीत बिघाडी झाली आहे का?

हा प्रश्न विधान परिषद निवडणुकीच्या निकाल नंतर लगेच विचारला गेला होता. या प्रश्नाचे उत्तर ९२.३% वाचकांनी "हो" असे दिले आहे तर "नाही" ७.७% वाचक म्हणत आहेत. माध्यमा मधून शिवसेने मधील   श्री एकनाथ शिंदे यांचा बंड तो पर्यंत समोर आलेला नव्हता. मात्र महा विकास आघाडीची मते फुटली आहेत हे विधान परिषद निवडणुकीच्या निकाला वरून दिसत होते. 
 

प्रश्न २. महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?


हा प्रश्न दि २१ जून २०२२ रोजी सकाळी वाचकांना विचारला, विधान परिषदेच्या निकाला नंतर शिवसेनेत जो श्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला व काही आमदारांच्या गटा सोबत सुरत गाठले, त्याच्या बातम्या माध्यमात फिरत असताना विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर ६६.७ % वाचकांना "हो" असे वाटते तर २६.३% वाचक "नाही" म्हणत आहेत. "माहित नाही" म्हणणारे ७% वाचक आहेत. येणाऱ्या काळात विधान सभेची त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आणि कोणत्याही पक्षाने अथवा गटाने सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होऊ शकते.

प्रश्न ३. आज समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास कोणता पक्ष स्थिर सरकार देऊ शकेल?

या प्रश्नाचे उत्तर वाचकांनी खूप स्पष्टपणे दिलेले दिसते, या प्रश्ना करिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पर्याय दिलेले होते. या प्रश्नाच्या उत्तरात ८०.१% वाचक भाजपच्या बाजूने कौल देत आहेत तर शिवसेना ७%, राष्ट्रवादी काँग्रेस ८.८% आणि काँग्रेस ४.१% वाचक पसंती देत आहेत. या प्रश्नातील वाचकांना स्पष्टपणे वाटते कि भाजप महाराष्ट्रात स्थिर सरकार देईल. या उत्तरातील अजून एक वैशिष्ट्य असे कि उर्वरित तीन पक्ष आणि भाजप यांच्यातील मत टक्केवारीची तफावत प्रचंड आहे. उर्वरित तिन्ही पक्षांची टक्केवारी एक केल्यास फक्त १९.९% इतकीच भरते. याचा अर्थ आता मध्यावधी निवडणूक झाल्यास भाजप ला ८०.१% मतदार पसंती देतील.

प्रश्न ४. समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंत कोण असेल?


या प्रश्नाच्या उत्तरात पर्याय होते श्री उद्धव ठाकरे, श्री देवेंद्र फडणवीस, श्री शरद पवार, श्री अजित पवार. या प्रश्नात काँग्रेस पक्षतील कोणताही नेत्याचे नाव नव्हते. मात्र श्री शरद पवार हे सर्व सहमतीचे नाव यात घेतले आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा वाचकांनी स्पष्टपणे दिले आहे, ७७.५% वाचकांना श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदा करिता पसंतीचे उमेदवार वाटतात. तर श्री उद्धव ठाकरे १३.४% वाचकांना पसंतीचे उमेदवार वाटतात. वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेल्या सर्वे मध्ये सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदा करिता पहिली पसंती दिसून आली आहे.

प्रश्न ५. मविअ सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीला तुम्ही १ ते १० मध्ये किती गुण द्याल?(१ सर्वात कमी  तर १० सर्वेत्तम) 

या प्रश्नाच्या उत्तरा करिता गुणांचे चार गट केले आहेत, १) १ ते ३ गुण  २) ४ ते ६ गुण  ३) ७ ते ९ गुण आणि ४) १० गुण, वाचकांनी मविअ ला १ ते १० मध्ये गुण दिले आहेत यात १ हे सर्वात खराब व १० हे सर्वात उत्तम या प्रकारे मांडणी करण्यात आली आहे. ६७.५% वाचक १ ते ३ गुण मविअ च्या अडीच वर्षाच्या कामगिरीला देतात तर १५.१% वाचक १० पैकी १० गुण देतात. ११.४% वाचक ७ ते ९ गुण मविअ ला देताना दिसत आहे. ४ ते ६ गुण फक्त ६% वाचक देत आहेत. या प्रश्ना द्वारे मविअ च्या अडीच वर्षाच्या कारभाराची जनतेच्या मनातील प्रतिमा दिसते. गट क्र ३ व ४ ची वाचकांची टक्केवारी एकत्र केल्यास २६.५% वाचक समाधानी आहेत असे दिसते.

प्रश्न ६. श्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर भाजपने सत्ता स्थापने साठी कोणती भूमिका घ्यावी असे तुम्हला वाटते?

या प्रश्नाच्या उत्तरा करिता पर्याय होते, १) सेना भाजप एकत्र २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र ४) मध्यावधी निवडणूक, या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा वाचकांचे वेग वेगळे मते दिसून येतात. १) सेना भाजप एकत्र  हा पर्याय भाजपाने निवडावा असे २५% वाचकांना तर २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत घ्यावे असे ३८.२% वाचकांना वाटते, ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र यावे असे फक्त ६.६ % वाचकांना वाटते तर मध्यावधी निवडणूक होतील असे ३०.३% वाचकांना वाटते. पर्याय क्रमांक १ व २ एकत्र केल्यास ६३.८% वाचकांना सेना भाजप ने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे असे वाटते.

 

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजप शिवसेना यांच्या युतीला मतदारांनी स्वीकारले होते व या युतीच्या बाजूने मतदान केले होते. येणाऱ्या काळात मविअ चे भवितव्य काय असेल हे  निश्चित होईल. तो पर्यंत धन्यवाद

 

(टीप; हा सर्वे ट्विटर वर घेतला आहे, याचा कालावधी मागील ३६ तास आहे. हा सर्वे एकूण ५२६५ वाचकांना पर्यंत पोहंचला आहे तर प्रत्यक्ष ६७८ वाचकांनी या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे.)

 

विराज वि देवडीकर