Thursday, 17 September 2020

ऑपेरेशन पोलो

 

स्वतंत्र भारताची एकात्मता व अखंडता टिकवणे हे प्राथमिक आव्हान स्वतंत्र भारता समोर उभे होते, भारतात एकूण ५८४ प्रिन्सली स्टेट म्हणजे रियासत होत्या,  त्यापैकी बहुतेक कसलीही अडचण निर्माण न करता भारतात सामील झाल्या, पण एक संस्थान जे भारताच्या स्वातंत्र्या नंतर भारतात सामील व्हायला १३ महिने आणि २ दिवस लागले. त्या संस्थानला स्वातंत्र करण्या करिता वेगळा स्वातंत्र्य लढा उभं राहिला आणि "ऑपेरेशन पोलो" नावाने सैन्याची मदत घ्यावी लागली, अशा लढ्याला आज ७२ वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्याने लिहलेला हा धागा

ऑपेरेशन पोलो ची कार्यवाही जरी १३ सप्टेंबर १९४८ ची असली तरी, या संस्थान विरुद्धचा स्वातंत्र्य लढा खूप आधी म्हणजे वेगळ्या पाकिस्थानच्या मागणी पासून सुरु झाला असे म्हणता येईल, महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणा या तीन प्रदेशात हा स्वातंत्र्य लढा उभा राहिला त्याला "हैद्राबाद मुक्ती संग्राम" असे सुद्धा म्हणतात. हा प्रदेश त्यावेळी हैद्राबाद रियासत म्हणजे निजामाच्या आधिपत्य खाली होता. त्यावेळेसच्या निजामाचे नाव होते "निजाम मीर उस्मान आली खान निजाम उल मुल्क आसीफ जाह VII ", हा हैद्राबाद संस्थांचा त्यावेळेसचा नवाब होता. निझामाने भारतात सामील न होता पाकिस्थानात सामील होण्यासाठीचे प्रयत्न १९४६ पूर्वीच चालू केले होते, व स्वातंत्र्य भारताच्या अनेक विनंत्यांना नाकारून निझामाने पाकिस्थांशी संबंध प्रस्थापित करणे सुरु केले. त्यावेळेसच्या हैद्राबाद संस्थान हिंदू बहुल होते तर नवाब हा मुसलमान होता. भाषिक दृष्ट्या तेलगू, मराठी, कन्नड आणि उर्दू भाषिक लोक राहत होते. त्यामुळे अर्थातच सर्व सामान्य नागरिकांनी व हिंदूंनी पाकिस्थानात सामील होण्याच्या निझामाच्या निर्णयाला विरोध करणास सुरवात केली. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैद्राबादच्या स्वातंत्र्य लढ्याने जोर पकडला.


याच काळात कासीम रझवी या लातूर येथील वकिलाने "रझाकार" या नावाने निजामाचे सैन्य उभा करण्यास सुरवात केली, कासीम रझवी हा Majlis-e-Ittehadul Muslimeen(MIM) या संघटनेचा त्यावेळेसचा अध्यक्ष होता. १५०००० रझाकार सैन्याची उभारणी त्याकाळी निजामाने केली. या रझाकारांनी तेथील हिंदू जनतेवर अनन्य अत्याचार भारताच्या स्वातंत्र्य नंतर करायला सुरवात केली. या रझाकारांच्या अन्याय-अत्याचार विरुद्ध शांततेच्या मार्गाने व क्रांतिकारक मार्गाने दोन्ही पद्धतीने जनतेने लढा देणाया सुरवात केली. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वा खाली गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या काँग्रेसच्या नेत्यांनी लढा उभारला तर मराठवाड्यातील गावा-गावात काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, जनार्दन होर्तीकर गुरुजी स्वातंत्र्यवीर निर्माण झाले. पण निजामाचे अत्याचार काही कमी होत नव्हते. त्यातच निझामाने भारतीय विमानांना हैद्राबादच्या आकाशातून उडण्याची परवानगी नाकारली तेव्हा भारताचे लोह पुरुष व त्यावेळेस भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी निझामाच्या संस्थानात सैन्य घुसवण्याचा निर्णय घेतला. हि कार्यवाही भारताच्या जमिनीवर होत असल्यामुळे त्याला मिलटरी ऍक्शन न म्हणता पोलीस ऍक्शन म्हटले गेले.

१३ सप्टेंबर १९४८ ला पोलीस ऍक्शनची सुरवात लेफ्टनं कर्नल राम सिंग यांच्या नेतृत्वात झाली, सोलापूर येथून मुख्य भारतीय फौज मराठवाड्यात सकाळी ४ वाजता घुसवण्यात आली दोन तासात नळदुर्ग मार्गे तुळजापूर ताब्यात घेण्यात आले तर संध्याकाळ पर्यंत परभणी पर्यंत चा परिसर भारतीय सैन्याने ताब्यात घेतला, १४ तारखेला उस्मानाबाद ताब्यात घेण्यात आले.  चाळीसगाव धुळे मार्गे दुसरी फौज घुसवण्यात आली कन्नड, दौलताबाद जिंकत या फौजेने १५ तारखेस औरंगाबाद जिकंले. १६ तारखेला लेफ्टनं कर्नल राम सिंग यांच्या नेतृत्वात भारतीय फौजेने बिदर काबीज केले, १७ तारखेच्या सकाळी निजामाने शरणागती स्वीकारली. हैद्राबाद संस्थान भारतात सामील झाले. हैद्राबाद पोलीस ऍक्शन वर नेमलेल्या पंडित सुंदरलाल कमिटी नुसार २७००० ते ४०००० जीवित हानी रझाकारा च्या हल्ल्यात झाली


निझामाने त्यानंतर Instrument of Accession वर सही केली, निझामाने भारतात न सामील होण्याचा निर्णय फक्त आणि फक्त धार्मिक दृष्टिकोन ठेऊन घेतला होता, त्याला पाकिस्थान सैन्यच्या मदतीची अपेक्षा होती, पण तसे काही होऊ शकले नाही.

धन्यवाद                                                                                      विराज

 

(थ्रेड आवडल्यास जरूर RT/Share करावे)

 

#Thread #थ्रेड #मराठी_धागा #मराठी_थ्रेड #Blog

No comments:

Post a Comment