Tuesday, 13 April 2021

आद्य सरसंघचालक प्रणाम

 

संघ निर्माते : डॉ केशव बळीराम हेडगेवार

आज परम पूज्य आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती, त्यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी नागपूर ला झाला. हिंदू तिथी नुसार त्यांचा जन्मदिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी झाला. त्यांनी हिंदूंचे विश्वव्यापी संघटन निर्माण केले व मागील ९७ वर्ष हे संघटन अविरत व्यक्ती निर्माणचे कार्य करत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरला झाले तेथेच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे व समाजकार्याचे संस्कार झाले. त्यांच्या जीवनावर त्यांचे थोरले बंधू महादेव शास्त्री यांचा प्रचंड प्रभाव होता. व त्यांच्याच माध्यमातून क्रांतिकार्याची ओळख डॉक्टरांना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रचंड प्रभाव डॉक्टरांवरती होता, त्यातूनच स्वातंत्र्य प्राप्ती करता सशस्त्र लढ्याची प्रेरणा त्यांना मिळाली. बालपणी मित्रांसोबत नागपुरातील सीताबर्डी किल्ल्या वरचा "युनियन जॅक" काढून त्याठिकाणी भगवा ध्वज त्यांनी लावला.


पुढे कलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये MBBS करिता त्यांनी ऍडमिशन घेतले आणि तेथेच ते बंगाल मधील क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. ते अनुशीलन समितीचे सदस्य बनले. त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून त्यांच्यावर हिंदू महासभेच्या बंगाल प्रांताच्या उपाध्यक्ष म्हणून जवाबदारी देण्यात आली. पुढे MBBS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर स्वगृही नागपूरला परत आल्यावर त्यांनी सरकारी नोकरी न करिता क्रांतिकार्य सुरु ठेवले. याच काळात ते काँग्रेस च्या संपर्कात आले व काँग्रेस चे सदस्य झाले. १९२० ला काँग्रेस चे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर ला झाले त्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्याच बरोबर त्यांनी "पूर्ण स्वातंत्र्याचा" ठराव या अधिवेशनात मांडला पण तो पास होऊ शकला नाही. डॉक्टर काँग्रेस च्या जहाल गटाचे सदस्य होते, त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता टिळकांच्या अकाली निधना मुळे काँग्रेस मधील जहाल गट कमकुवत झाला होता. १९२१ मध्ये त्यांनी असहकार आंदोलनात सत्याग्रह केला व एक वर्ष कारावास सुद्धा भोगला होता. पण त्याच बरोबर त्यांनी गांधीजींच्या खिलाफत आंदोलनाला तीव्र विरोध केला. तुर्कीस्तानच्या राजा करिता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वापर करणे त्यांना मान्य नव्हते.


सक्षम राष्ट्रा करिता सक्षम समाज निर्माण होणे गरजेचे आहे. हिंदू समाजाला संघटित, अनुशासित आणि बलशाली होणे अत्यंत आवश्यक आहे. व ते कार्य संघ शाखेत केले जाते या उद्देशातून १९२५ च्या विजयादशमी च्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ स्थापने वेळी त्यांचे वाक्य होते,  ‘’मैं आज संघ (संगठन) की स्थापना की घोषणा करता हूं‘’ एक वर्षांनी या संघटनेचे "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हे नमःकारण करण्यात आले. संघ स्थापने पासून पुढे १५ वर्ष त्यांनी संघाचे सरसंघचालक म्हणून जवाबदारी स्वीकारली. या काळात त्यांनी संघ भारत भर नेला, त्याकरिता अखंड प्रवास, भारत भ्रमण, अनेक व्यक्तीना भेटणे व त्यांना संघाशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले. स्वकृतीतून त्यांनी अनेकदा स्वयंसेवकांना शिस्तीचे धडे दिले. १९४० पर्यंत संघ भारत भर पोहंचला होता, १९४० च्या तृतीय वर्षां वर्गाच्या स्वयंसेवकांसमोर आपल्या शेवटच्या बौद्धिकात बोलताना त्यांनी म्हटले होते, " मी हिंदुराष्ट्राचे छोटे रूप तुम्हा सर्वात पाहत आहे"

 

संघे शक्ति: इति ज्ञात्वा लोककल्याणकारक:| येन संघ कृतस्तस्मै केशवाय नमो नमः ||

 

अर्थात “संघटनेमध्ये सामर्थ्य असते, हे ओळखून लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला, अशा त्या केशवांना पुनः पुनः नमस्कार असो.”

 

आद्य सरसंघचालक प्रणाम