Wednesday 27 May 2020

स्वा. सावरकर, सामाजिक सुधारणांचे मार्ग


स्वा. सावरकर यांच्या चरित्राचे मुखत्वे दोन भाग पडतात एक क्रांतिकारक सावरकर आणि दुसरे समाज क्रांतिकारक सावरकर. मागील एका  वर्षा पासून समाज क्रांतिकारक सावरकर या चरित्राचा अभ्यास करायला सुरवात केली, व हा प्रयत्न चालू केला की स्वा. सावरकरांच्या समाजक्रांतीचे स्वरूप सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावे, त्यांना त्याविषयी समजावे, त्यांनी जाणून घ्यावे या करिता आपल्या अकलना प्रमाणे त्याचे स्वरूप मांडायला सुरवात केली. या वर्षी स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथी दिवशी पहिला लेख प्रकाशित केला,  "पतितपावन मंदिर आणि स्वा. सावरकरांची भूमिका" या ब्लॉग द्वारे पतितपावन मंदिर आणि त्यामागील स्वा. सावरकरांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला (त्याची लिंक सोबत  जोडली आहे). आज सावरकर जयंती दिनी दुसरा लेख(ब्लॉग) सादर करत आहे, "स्वा. सावरकर, सामाजिक सुधारणांचे मार्ग"  या विषयाचा अभ्यास करताना प्रा. शेषराव मोरे यांचे पुस्तक "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" ची खूप मदत झाली. या पुस्तकातून सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचे स्वरूप स्पष्ट होते. 
Photo by Sw. Savarkar Rashtriy Smarak Samiti, Mumbai
सावरकरांना समाज सुधारणेचे तीन मार्ग मान्य होते, १) मन:परिवर्तन २) कायद्याचा मार्ग ३) संघर्ष किंवा सत्याग्रहाचा मार्ग. समाज सुधारकांनी यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा वापर करून समाज सुधारणेचे कार्य केले पाहिजे असे त्यांचे मत होत. स्वतः सावरकरांनी रत्नागिरी येथील कार्यकाळात पहिल्या दोन मार्गांचा वापर आपल्याला केलेला दिसतो. मात्र त्यांनी सत्याग्रह किंवा संघर्ष या तिसऱ्या प्रकारचा वापर फारसा केलेला दिसत नाही. या बाबतीती प्रा. नरहरी कुरुंदकरांनी या विषयी दिलेला अभिप्राय विचारात घेतला पाहिजे, "अस्पृशांना सार्वजनिक पाणवठे व देवळे मोकळी करावीत, हे तर त्यांचे मत होतेच; पण त्यांच्या सहभोजना पासून बेटीबंदी तोडण्या पर्यंत च्या सर्व कार्यक्रमांना पाठिंबा असे... लिखाणात क्रांतिकारी भूमिका घेणारे सावरकर व्यवहारात सौम्यात्म सत्याग्रहाचा मार्ग आचरत होते, यावर वाद घालण्याचे कारण नाही. त्यांचा स्वतःचा कार्यक्रम सौम्यतम असेल; पण इतर कोणी जहाल कार्यक्रम घेतल्यास त्याला त्यांचा पाठींबा असे. फाटे फोडून विरोध करण्याची त्यांची पद्धत नसे"  प्रा. कुरुंदकरांच्या विधाना वरून आपल्याला हे जाणवते सावरकरांचे समाज सुधारणेचे धोरण किती स्पष्ट व खंबीर होते. या करीत जे वेगवेगळे जातीउच्छेदन व अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यावेळी सत्याग्रह होत होते त्याला स्वा. सावरकरांनी  पाठिंबा दिला. उदाहरण घ्यायचे झाले तर, "पर्वती मंदिर सत्याग्रह" च्या समर्थनात सावरकरांनी लिहलेला 'पुण्यातील तीन हजार मंबाजीबुवा' हा लेख. या सत्याग्रहात सनातन्यानी पूर्वास्पृश्यां वरती लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला  त्याची घोर निदा/टीका सावरकरांनी या लेखात केली आहे. नाशिक येथील "काळाराम मंदिर प्रवेशा" करिता नाशिककरानी पाठिंबा देण्याबाबत विनंती करणारे पत्र सावरकरांनी १३ मार्च १९३१ रोजी लिहले, या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला त्यांनी पाठिंबा देताना म्हटले, "पूर्वास्पृश्याची मंदिर प्रवेशाची मागणी अत्यंत धर्म्य, न्याय्य आहे आणि ते ज्या सत्याग्रहाच्या निकरावर आलेले आहेत, तो सत्याग्रह आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या दुराग्रहाचाच केवळ एक अपरिहार्य पडसाद आहे ! साठ-सत्तर पिढ्या त्यांनी वाट पहिली. आणखी वाट ती त्यांनी किती पाहावयाची? आता आपणच टी वाट मोकळी करून देणे एवढेच बाकी उरले आहे." हे लिहताना सावरकर म्हणतात पूर्वास्पृश्याचे मंदिरात हात जोडून उत्कट प्रेमाने स्वागत करावे आणि क्षमायाचना करावी, १९३१ ला "मुंबई इलाखा अस्पृश्यतानिवारक परिषदेच्या" अध्यक्ष पदावरून रत्नागिरी येथे भाषण करताना ते म्हणाले, " मी मोकळा असतो तर नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात स्वतः झुंजलो असतो" (११४) डॉ नारायणराव सावरकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मंदिर प्रवेशाच्या दृष्टीने वातावरण तयार करणायचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस चा व महात्मा गांधींचा १९३१च्या मंदिर प्रवेश सत्याग्रहास विरोध होता. त्यांच्या दृष्टीने मंदिर प्रवेशाची चळवळ अन्याय कारक होती. 
फक्त मंदिर प्रवेश सत्याग्रहा ना सावरकरांनी पाठिंबा दिला असे नाही, महाड सत्याग्रहास सुद्धा पाठिंबा दिला. स्वा. सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार श्री धनंजय कीर म्हणतात," या लढ्याला निर्भय व मनःपूर्वक पाठिंबा जर कोणी पुढाऱ्याने दिला असेल तो एकट्या सावरकरांनीच !" महाड येथील आंदोलन डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर १९२७ ला सुरु होणार होते, त्या पूर्वी १/०९/१९२७ ला स्वा. सावरकरांनी या सत्याग्रहा संबंधी सविस्तर लेख लिहून डॉ आंबेडकरणाच्या चळवळीस पाठिंबा दिला. सत्याग्रह नंतर म्हणजे डिसेंबर १९२७ नंतर महाड येथे काही अस्पृश्यास तळ्याचे पाणी पिण्यास रोखले गेले, मारहाण झाली, तळ्यात गोमूत्र टाकून शुद्धी कारणाचा प्रयत्न केला गेला या सनातन्यांच्या कृतीवर सावरकर कठोर टीका करताना म्हणतात," महाडास जाऊन त्या तळ्यावर सामसत्याग्रहाने अस्पृश्यांस पाणी पिऊ देण्याचा प्रयत्न करणे हे अस्पृश्यांचेच नव्हे तर सर्व हिंदूमात्राचे कर्तव्य आहे. जर त्यात काही अतिरेक होत असेल तर तो डॉ. आंबेडकरांच्या सत्याग्रह -मंडळाकडून नसून तो महाडच्या धर्मविमूढ स्पृश्यांकडूनच होय !" सावरकर पक्षाने एवढ्यावरच न थांबता या सत्याग्रहा नंतर सनातन्यांन द्वारे चालेल्या तळ्याच्या शुद्धी कारणाच्या प्रयत्नांना हाणून पडले. १ मार्च १९३१ च्या "जनता" ने याची दाखल घेतली व त्या विषयी लिहले.(११३) 
नाशिक येथे १९२४ ला "स्वातंत्र्य" या पत्रास मुलाखत देताना सावरकरानी समाज सुधारणे साठी सत्याग्रह मार्गाचे जोरदार समर्थन केले. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरणे, देवळात जाऊन देव दर्शन घेण्याचा अस्पृश्यांना अधिकार असला पाहिजे, त्याकरिता सत्याग्रहाचा मार्ग अस्पृश्यानी स्वीकारला पाहिजे असे ठाम मत सावरकरांनी प्रगट केले. विशेष म्हणजे हेच सावरकर इंग्रजा विरुद्ध गांधीजींच्या सत्याग्रहा चे विरोधक होते(१११). पण वेळ, काळ, परिस्थिती, सुधारणेचे स्वरूप, सुधारकपक्षाचे सामर्थ्य आणि कायद्याचा पाठिंबा या गोष्टी विचारात घेऊन सुधारणेचा मार्ग निवडण्याचे धोरण सावरकरांनी स्वीकारले होते.
सुधारणे साठी कायद्याच्या वापराबद्दल सुद्धा स्वा. सावरकर आग्रही होते असे आपल्याला  दिसते, १९२३ ला "सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांचा नागरी हक्क मान्य करणारा ठराव मुंबई विधिमंडळाने मंजूर केला. याच ठरावाचा उपयोग करून १९२४ साली महाड नगर पालिकेने चवदार तळे अस्पृस्यांसाठी खुले केले. तसेच १९२३ साली रत्नागिरी जिल्हा बोर्डाने  त्यांच्या सर्व शाळांत अस्पृश्यता पाळता कामा नये असा आदेश काढला. पण हा ठराव दप्तरी पडून होता. सावरकरांनी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक वर्ष आंदोलन केले.
"जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख" हा त्यांचा अभ्यासनीय लेख आहे. कायद्यासमोर सर्वजण सामान आहोत या तत्वावर आधारलेल्या आणि जन्मजात जातिभेदाला मूठमाती देणाऱ्या यात तरतुदी आहे. 'Slavery is abolished' या घोषणे पेक्षा "Untouchability is abolished" ही घोषणा अधिक महान आहे असे त्यांना वाटे. जातीउच्छेदन आणि अस्पृश्यता निवारण या विषयी मूलभूत कार्य स्वा. सावरकरांनी त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात केले. सार्वजनिक अस्पृश्यता निवारण ज्यात सभा समारंभात एकत्र बसने असेल, शाळा महाविद्यालयात एकत्र बसने असेल, नंतर मंदिर प्रवेश असेल, रोटीबंदी मोडणे व बेटीबंदी मोडणे या कार्याची वाटचाल राहिली.

वंदे मातरम


विराज विजयकुमार देवडीकर
(viraj.devdikar@gmail.com)

लेख जरूर शेअर करावा

"पतितपावन मंदिर आणि स्वा. सावरकरांची भूमिका" Link https://virajdevdikar.blogspot.com/2020/02/blog-post.html


No comments:

Post a Comment