Wednesday, 22 June 2022

राजकीय सर्वे: महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?

 

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या नंतर झालेल्या राजकीय घडामोडीवर काल पासून आम्ही ट्विटर वर एक सर्वे केला होता. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मनात नेमके काय दडले आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मराठी भाषिक असलेल्या ट्विटर वरील “ट्विटर हॅण्डल” ने या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे (प्रश्न व पर्याय मराठीत असल्यामुळे). हा सर्वे कोणत्याही राजकीय पक्षा करिता अथवा त्या राजकीय पक्षाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन केलेला नाही. यात नोंदवलेली मते ही वेगवेगळ्या ट्विटर हॅन्डल ची आहेत आमची नाही.

प्रश्न १. भाजपचे पाच ही उमेदवार विजयी, आघाडीत बिघाडी झाली आहे का?

हा प्रश्न विधान परिषद निवडणुकीच्या निकाल नंतर लगेच विचारला गेला होता. या प्रश्नाचे उत्तर ९२.३% वाचकांनी "हो" असे दिले आहे तर "नाही" ७.७% वाचक म्हणत आहेत. माध्यमा मधून शिवसेने मधील   श्री एकनाथ शिंदे यांचा बंड तो पर्यंत समोर आलेला नव्हता. मात्र महा विकास आघाडीची मते फुटली आहेत हे विधान परिषद निवडणुकीच्या निकाला वरून दिसत होते. 
 

प्रश्न २. महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?


हा प्रश्न दि २१ जून २०२२ रोजी सकाळी वाचकांना विचारला, विधान परिषदेच्या निकाला नंतर शिवसेनेत जो श्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला व काही आमदारांच्या गटा सोबत सुरत गाठले, त्याच्या बातम्या माध्यमात फिरत असताना विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर ६६.७ % वाचकांना "हो" असे वाटते तर २६.३% वाचक "नाही" म्हणत आहेत. "माहित नाही" म्हणणारे ७% वाचक आहेत. येणाऱ्या काळात विधान सभेची त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आणि कोणत्याही पक्षाने अथवा गटाने सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होऊ शकते.

प्रश्न ३. आज समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास कोणता पक्ष स्थिर सरकार देऊ शकेल?

या प्रश्नाचे उत्तर वाचकांनी खूप स्पष्टपणे दिलेले दिसते, या प्रश्ना करिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पर्याय दिलेले होते. या प्रश्नाच्या उत्तरात ८०.१% वाचक भाजपच्या बाजूने कौल देत आहेत तर शिवसेना ७%, राष्ट्रवादी काँग्रेस ८.८% आणि काँग्रेस ४.१% वाचक पसंती देत आहेत. या प्रश्नातील वाचकांना स्पष्टपणे वाटते कि भाजप महाराष्ट्रात स्थिर सरकार देईल. या उत्तरातील अजून एक वैशिष्ट्य असे कि उर्वरित तीन पक्ष आणि भाजप यांच्यातील मत टक्केवारीची तफावत प्रचंड आहे. उर्वरित तिन्ही पक्षांची टक्केवारी एक केल्यास फक्त १९.९% इतकीच भरते. याचा अर्थ आता मध्यावधी निवडणूक झाल्यास भाजप ला ८०.१% मतदार पसंती देतील.

प्रश्न ४. समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंत कोण असेल?


या प्रश्नाच्या उत्तरात पर्याय होते श्री उद्धव ठाकरे, श्री देवेंद्र फडणवीस, श्री शरद पवार, श्री अजित पवार. या प्रश्नात काँग्रेस पक्षतील कोणताही नेत्याचे नाव नव्हते. मात्र श्री शरद पवार हे सर्व सहमतीचे नाव यात घेतले आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा वाचकांनी स्पष्टपणे दिले आहे, ७७.५% वाचकांना श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदा करिता पसंतीचे उमेदवार वाटतात. तर श्री उद्धव ठाकरे १३.४% वाचकांना पसंतीचे उमेदवार वाटतात. वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेल्या सर्वे मध्ये सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदा करिता पहिली पसंती दिसून आली आहे.

प्रश्न ५. मविअ सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीला तुम्ही १ ते १० मध्ये किती गुण द्याल?(१ सर्वात कमी  तर १० सर्वेत्तम) 

या प्रश्नाच्या उत्तरा करिता गुणांचे चार गट केले आहेत, १) १ ते ३ गुण  २) ४ ते ६ गुण  ३) ७ ते ९ गुण आणि ४) १० गुण, वाचकांनी मविअ ला १ ते १० मध्ये गुण दिले आहेत यात १ हे सर्वात खराब व १० हे सर्वात उत्तम या प्रकारे मांडणी करण्यात आली आहे. ६७.५% वाचक १ ते ३ गुण मविअ च्या अडीच वर्षाच्या कामगिरीला देतात तर १५.१% वाचक १० पैकी १० गुण देतात. ११.४% वाचक ७ ते ९ गुण मविअ ला देताना दिसत आहे. ४ ते ६ गुण फक्त ६% वाचक देत आहेत. या प्रश्ना द्वारे मविअ च्या अडीच वर्षाच्या कारभाराची जनतेच्या मनातील प्रतिमा दिसते. गट क्र ३ व ४ ची वाचकांची टक्केवारी एकत्र केल्यास २६.५% वाचक समाधानी आहेत असे दिसते.

प्रश्न ६. श्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर भाजपने सत्ता स्थापने साठी कोणती भूमिका घ्यावी असे तुम्हला वाटते?

या प्रश्नाच्या उत्तरा करिता पर्याय होते, १) सेना भाजप एकत्र २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र ४) मध्यावधी निवडणूक, या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा वाचकांचे वेग वेगळे मते दिसून येतात. १) सेना भाजप एकत्र  हा पर्याय भाजपाने निवडावा असे २५% वाचकांना तर २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत घ्यावे असे ३८.२% वाचकांना वाटते, ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र यावे असे फक्त ६.६ % वाचकांना वाटते तर मध्यावधी निवडणूक होतील असे ३०.३% वाचकांना वाटते. पर्याय क्रमांक १ व २ एकत्र केल्यास ६३.८% वाचकांना सेना भाजप ने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे असे वाटते.

 

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजप शिवसेना यांच्या युतीला मतदारांनी स्वीकारले होते व या युतीच्या बाजूने मतदान केले होते. येणाऱ्या काळात मविअ चे भवितव्य काय असेल हे  निश्चित होईल. तो पर्यंत धन्यवाद

 

(टीप; हा सर्वे ट्विटर वर घेतला आहे, याचा कालावधी मागील ३६ तास आहे. हा सर्वे एकूण ५२६५ वाचकांना पर्यंत पोहंचला आहे तर प्रत्यक्ष ६७८ वाचकांनी या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे.)

 

विराज वि देवडीकर 

Tuesday, 10 May 2022

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी

 

#चष्म्यातून_इतिहास, #१८५७चे_स्वातंत्र्यसमर, #वीर_सावरकर

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आजच्या दिवशी, १० मे १८५७ साली पडली,

 

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या लढ्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. "शिपायांचे बंड" म्हणून ब्रिटिश व डाव्या विचारसरणीने  हिणवले गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला सणसणीत चपराक म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड' नव्हे, तर भारताचे पहिले `स्वातंत्र्ययुद्ध' होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले. हुतात्मा मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टेपे या सारख्या असंख्य वीरांनी कंपनी सरकारला सशस्त्र विरोध केला होता. त्यावेळेसच्या भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रदेशात युद्धाचा भडका उडाला, मेरठ येथील लष्कराच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. मेरठ छावणी उत्तर भारतातील सर्वात महत्वाची आणि मोठी छावणी होती, या छावणीत देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते. 


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली.  असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानासपद धिंड काढली. त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी, १० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.

हा उठाव पाहून नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहाद्दुरशहा जाफर, राणी लक्ष्मीबाई या व अशा वीरांनी अनेक ठिकाणी कंपनी सरकार विरुद्ध युद्ध पुकारले. हा लढा पुढे वर्ष भर वेगवेळ्या लढयातून सुरु राहिला पण यशस्वी होऊ शकला नाही. या उठावा मुळे कंपनी सरकारचा कारभार जाऊन भारतातात ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य आले. या उठावा मुळे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजा बद्दल व समाज व्यवस्थेबद्दल अधिक जगरुक झाले. हाच उठाव त्यानंतरच्या भारतीय स्वातंत्र्या करिताच्या अनेक लढायांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या प्रमुख नेत्याबरोबरच चापेकर बंधू, भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व ९० वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.


या लढ्यात महाराष्ट्रातील औंध संस्थानाने सहभाग घेतला व कंपनी सरकार विरुद्ध लढा दिला, दक्षिण भारतात इतरत्र हा उठाव झालेला दिसत नाही, बंगाल या उठावा पासून अलिप्त राहिले तर पंजाब कंपनी सरकारच्या समर्थनात उतरले. त्यामुळे लोकमान्यांनी या उठावाचे वर्णन करताना "हिंदुस्थानी वेगवेगळे लढले म्हणून हरले" अशा प्रकारे केले आहे. 

विराज वि देवडीकर

 

Thursday, 14 April 2022

जय भीम

 

आज परम पूज्य डॉ भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेबांची १३१ वी जयंती, त्यांच्या पवित्र स्मृतीस विनंम्र अभिवादन.

"जय भीम ही फक्त आरोळी नाही, ती सुरवात आहे प्रत्येक अन्याया विरुद्ध लढण्याची...!!!"

 


या वर्षी "जय भीम" नावाचा चित्रपट पाहिला, या चित्रपटात कोठेही जय भीम नावाची घोषणा किंवा आरोळी दिली नव्हती पण हा चित्रपट एका कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी सांगत होता. बाबासाहेबांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र दिली. यातील संघर्ष हा अंतिम टप्पा जरी असला तरी याची सुरवात शिक्षणातून होते हे महत्वाचे, बाबासाहेबांचे चरित्र वाचतांना/आभ्यासतांना याची जणिव होत राहते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती बाबासाहेबांना अशाच संघर्षाला तोंड द्यावे लागले. लहान असताना शिक्षणा साठीचा संघर्ष, तरूणपणी अस्पृश्ते विरुद्धचा संघर्ष, समाजात स्वतःला प्रस्थपित करण्याचा संघर्ष, राजकीय संघर्ष, आणि स्वतःच्या समाजाला देशाच्या मूळप्रवाहात आण्यासाठीचा संघर्ष या सर्व काळात ज्ञान आणि शिक्षण बाबासाहेबांच्या सोबत होते. स्वतः शिकत राहणे, त्या शिकण्यातून/ज्ञानातून समाजाचे व देशाचे आध्यायन करणे आणि स्वतःचा एक विचार निर्माण करणे, त्या विचाराकरिता झगडणे/संघर्ष करणे व वंचितना न्याय मिळवून देणे बाबासाहेबांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते. बाबासाहेबांना बुद्धिनिष्ठ समाजाची अपेक्षा होती, असा समाज फक्त शिक्षणामुळे निर्माण होतो. शिक्षणामुळे अन्यायाची जाणीव निर्माण होते, अन्याया विरुद्ध संघर्ष करण्याची सुरवात संघटित होण्यातून होते  आणि संघर्षा मुळे न्याय मिळतो हे बाबासाहेबांच्या चरित्रातून शिकायला मिळते. चवदार तळ्याचा संघर्ष फक्त पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता तर मूलभूत आधिकारां साठी होता, एकच पाणवठा सारख्या अनेक मूलभूत अधिकारा पासून वंचित असलेल्या समाजाला न्याय देण्याची सुरवात चवदार तळ्याच्या संघर्षातून बाबासाहेबांनी मिळवून दिला.



मागील वर्षी जेव्हा धनंजय कीर लिखित बाबासाहेबांचे चरित्र वाचायला घेतले तेव्हा त्यांच्या आयुष्याचे अनेक नवे पैलू समजायला सुरवात झाली. पुस्तकांबद्दल बाबासाहेबांना विशेष आकर्षण होते, मुंबईतील राजगृह या त्यांच्या निवासस्थानी खूप मोठे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात देश-विदेशातून त्यांनी आणलेली अनेक पुस्तके आहेत. न्यूयार्क मधील आठवण धनंजय कीर यांनी लिहून ठेवली आहे, बाबासाहेबांनी एकदा २००० जुनी पुस्तके न्यूयॉर्क मधून विकत घेतली व भारतात पाठवली होती. लंडन असेल किंवा न्यूयॉर्क असेल तेथील वास्तव्यात अनेक पुस्तके बाबासाहेबांच्या सोबत होती व नंतर ती मुंबईत संग्रहित करण्यात आली.

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर

Sunday, 13 March 2022

काश्मीर फाइल्स

 

कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात, एक बाजू प्रकाशात असतांना दुसरी बाजू अंधारात असते, पण काश्मीर पंडितां वरील अन्याया बाबत मात्र कायम एकच बाजू उद्दिष्टपूर्वक आपल्या समोर ठेवलेली होती. काश्मीर फाईल्स आपल्या समोर ती अप्रकाशी बाजू आणतो. ज्यांनी विवेक अग्निहोत्री यांचा या पूर्वीचा ताशकंद फाइल्स पहिला असेल त्यानं एकूण या चित्रपटाची रचना आणि मांडणी लक्षत येईल. ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना (काश्मिरी हिंदूंना) अंगावरील  कपड्यानिशी काश्मीर खोऱ्यातून हाकलून देण्यात आले व एकूणच काश्मीर खोरे भारताचा अविभाज्य भाग कसा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु झाला.



जानेवारी १९९० च्या त्या दोन दिवसात "इस्लाम स्विकारा, कश्मीर सोडा अथवा मरा" असा फतवा खोऱ्यातील जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रेंट ने दिला आणि काफिर अर्थात काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड सुरु झाले. काश्मीर खोऱ्यातील हिंदूंची राहती घरे, दुकाने, वस्त्या, शेती, उद्योग-व्यवसाय यांना आग लावण्यात आली. हिंदू स्त्रिया वरती अत्याचार करण्यात आले. हे होत असताना व्यवस्था (सरकार) षंढ बनून बसले होती. १९-२० जानेवारी १९९० या दोन दिवसात काश्मीर खोऱ्यातील असंख्य हिंदूंचा संहार करण्यात आला. पण परंपरागत माध्यमांनी आणि प्रस्थपित राज्य व्यवस्थेने हा सर्व संहार उर्वरित भारतीय समाजा पासून लपवून ठेवला. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा व तो सरकारी व्यवस्थेतून दाबून टाकण्याचा प्रयत्न मागील ३२ वर्ष चालू होता, मात्र काश्मीर फाईल्सच्या रूपाने पुन्हा एकदा तो रक्तरंजित इतिहास भारतीय सर्वसामान्याच्या  समोर आला आहे. ​फुटीरतावादी (वामपंथीय) विचारवंतांच्या इकॉसिस्टम ने काश्मीर व काश्मिरी हिंदू कशा प्रकारे अखंड भारताचा भाग नव्हते याच्या सुरस कहाण्या तर तयार केल्याचं पण या दोन दिवसातील हत्याकांडला स्वातंत्र्य युद्धाचे व क्रांतीचे नाव दिले. हा चित्रपट पाहताना हे जाणवून जात की "फ्री काश्मीर", "आझादी" या प्रकारच्या घोषणा देणारे फुटीरतावादी जाणीव पूर्वक काश्मीर खोऱ्यात अशांतता कायम स्वरूपी राहावी या करिता प्रयत्न करताना दिसतात. कथा-कथित पुरोगामी माध्यमांचा अशांत काश्मीर खोरे निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका या चित्रपटातून समोर येते. हा चित्रपट १९९०नंतर जन्माला आलेल्या सर्व प्रकारच्या माध्यमां च्या भूमिके विषयी बोलताना दिसतो. एकूणच प्रिंट व त्यानंतर इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमातून काश्मीर मध्ये निर्माण करण्यात येणारे अशांतेचे वातावरण व त्या द्वारे काश्मिरी युवकांची माथे भडकवण्याचे काम फुटीरतावादी करत असतात असे हा चित्रपटात सांगतो. भारतीय सैन्याचे खच्चीकरण करणारी शासन व्यवस्था व त्यांना मदत करणारे लुटीयन मीडिया यांनी कश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडला आणि विस्थापनाला उर्वरित जगा पासून दडपून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली हे चित्रपट बघताना जाणवते. या काळातील कश्मिरी हिंदू वर होणारे अत्याचार पडद्यावर पाहताना अंगाचा थरकाप उडतो व तळपायाची आग मस्तकात जाते.

या चित्रपटात वास्तवाचं दर्शन दिसत, काश्मिरी हिंदू हे काश्मिरी संस्कृतीचे व भाषेचा भाग होते तरी सुद्धा त्यांचावरती अन्याय झाला, त्यानां काश्मीर मधून विस्थापित व्हावे लागले हे सत्य हा चित्रपट अधिरेखीत करतो.
विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाची मांडणी अगदी उत्तम केली आहे. एखादी घटना, त्याचे स्वरूप, त्या घटनेचे काश्मिरी समाजावर होणारे परिणाम, शासन व्यवस्थेचे त्या घटनेचे आकलन याची संदर्भ सहित मांडणी या चित्रपटात केली आहे. या जोडीला योग्य प्रकारे निवडलेले कलाकार व त्यांची भूमिका खूप प्रभाव टाकून जाते. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर आणि मृन्मय जोशी यांनी त्यांच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. चित्रपटातील भाषेची मांडणी ही काल सांगत आहे व त्याद्वारे सुद्धा खूप प्रभाव निर्माण केला आहे. एकूणच हा चित्रपट वास्तवाचे दर्शन करणार आहे त्यामुळे जरूर पहावा. पण त्यापेक्षा सुद्धा काश्मिरी हिंदू वर झालेल्या अन्यायाच्या वास्तवा करिता पहावा. 

धन्यवाद

 

विराज व देवडीकर

Saturday, 2 October 2021

गांधीजी

 #वर्षाचा_दिवस_२७५वा

परवा गांधी जयंती निमित्याने मुलीला भाषण लिहून देत होतो, तेव्हा माझ्या लहानपणीची आठवण झाली. लहानपणी शाळेत असताना गांधीजी म्हटलं कि अनेक टवाळखोर पोर "म्हतारा, टाकल्या, दात पडका" म्हणून संबोधायची, ते बालबोध दिवस होते पण जस जसा मोठा झालो तस तस बोध व्हायला सुरवात झाली आणि गांधी या चरित्राची ओळख झाली. ऍग्रीकल्चर ला बीड ला आल्यावर गांधी जींचं आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक वाचले आणि गांधी जी शी नव्याने ओळख झाली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वचा महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सामान्य पण होते, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे जाणवते. गांधीजी याच सामान्य पणा मुळे असामान्य व्यक्तिमत्व बनले असे म्हणता येऊ शकते. हा सामान्य पणा त्यांच्या लहानपणा पासून त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनां मध्ये दिसून येतो. बालपण, शिक्षण, लग्न, उच्च शिक्षण या मध्ये हा सामान्य पणा स्पष्टपणे जाणवतो. गांधीजींनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक चुका स्वीकारल्या आणि स्वतःच्या आत्मचरित्रात मांडल्या सुद्धा, त्यांचे आत्मचरित्र वाचताना आपल्याला हे विशेष जाणवत राहते.  या सामान्यपणातूनच त्यांच्यात तत्वनिष्टता निर्माण झाली असे म्हणता येऊ शकते, गांधीजी प्रचंड तत्वनिष्ठ होते आणि त्यांनी वैयक्तिक व राजकीय आयुष्यात ती तत्वे तेवढ्याच निष्ठेने पाळली. 


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामान्य भारतीयांना जोडण्याचे काम गांधीजींनी केले, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंग असे आहेत ज्यामुळे सामान्य भारतीय या लढ्याशी जोडला गेला, ज्यात असहकार आंदोलन असेल, मिठाचा सत्याग्रह असेल किंवा चले जावं चळवळ असले. सामान्य भारतीय या प्रकारच्या लढ्यातून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू शकला. उपोषण, मौन, असहकार, स्वदेशी या सामान्य आंदोलना मुळे सामान्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर उरलाच पण स्वातंत्र्य लढ्याची चेतना भारत भर पोहंचवण्यास मदत झाली, या सर्व आंदोलनाची व्याप्ती भारत भर झाली आणि ते त्यांचे असणारे सामान्य स्वरूप आणि सर्व सामान्य लोकांचा सहभाग. १९१६ साली चंपारण्यातील निळं उत्पादक शेतकऱ्यांचा लढा गांधीजींच्या नेतृत्वा खाली लढला गेला व यशस्वी झाला, हा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह ज्यामुळे सामान्य भारतीय लोकांना गांधीजींची ओळख झाली. गांधीजींचं नेतृत्व असामान्य होत हे निर्वीवादीत सत्य आहे. गांधीजींनी भारतीय सामान्य जणांना व्यवस्थित जाणलं होते, सामान्य भारतीयांना जोडल्याशिवाय भारताचे स्वतंत्र शक्य नाही याची जाण गांधीजींना नक्कीच होती. सामान्य लोकांच्या मध्ये रमणारे नेतृत्व गांधीजींचे होते.गांधीजींच्या नेतृत्वाची भुरळ आज सुद्धा असंख्य भारतीयांच्या मनावर आहे. अनेक सामान्य घटनांतून गांधीजींनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. टिळकांच्या निधना नंतर नेतृत्वहीन झालेला भारतीय स्वातंत्र्यलढ्याला गांधीजींनी नेतृत्व तर दिलेच पण स्वरूप सुद्धा दिले. सामान्य भारतीय मनाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडण्यासाठी गांधीजींनी अर्ध नग्न असणाऱ्या सामान्य लोकं प्रमाणेच गांधीजींनी स्वतःचा वेष केला व तो आयुष्यभर जपला. 


गांधीजींची हिंदू धर्मा वरती निष्ठा होती आणि हिंदू संस्कृतीवर त्यांचा दृढ़ विश्वास होता. गांधीजींच्या दैंनंदिन आयुष्यातील अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे त्यांची हिंदू धर्मा वरील श्रद्धा स्पष्ट होते. या द्वारे सुद्धा गांधीजींनी स्वतःला सामान्य भारतीयांशी जोडले होते व त्याचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी करून घेतला.

गांधीजींच्या राजकीय विचारांशी आक्षेप असू शकतात, सक्षम लोकशाही पद्धतीत ते स्वीकारले पाहिजेत. माझ्या सहित अनेक जण त्यांच्या राजकीय मतांशी सहमत नसतील पण जगातील अनेक विचारवंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकारते, उद्योग व इतर क्षेत्रातील प्रतिभावंत आज सुद्धा गांधीजींना प्रेरक मानतात ते त्यांच्या सामान्यपणा मधून निर्माण झालेल्या सर्व व्यापी नेतृत्वाला.

आज गांधीजींच्या १५२ व्या जयंती निमित्याने त्यांना विनम्र अभिवादन

 

विराज विजयकुमार देवडीकर